दुपारी एकनंतर लॉकडाऊनला 100 टक्के प्रतिसाद
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – करोना संसर्ग लागण झालेल्या व्यक्तींची संख्या वाढल्याने राजगुरूनगर शहरात सोमवार (दि. 6) पासून स्थानिक प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनला दुपारी 1 वाजेनंतर 100 टक्के प्रतिसाद मिळाला त्यामुळे नियम शिथिल केल्यानंतर गजबजलेल्या शहरात सामसूम दिसत होती.
खेड तालुक्यात करोनाग्रस्तांचे द्विशतक झाले असल्याने नागरिकांनीच बंदची हाक दिली होती. याबरोबरच स्थानिक राजकीय नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार तालुक्याची करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना व आवश्यक कारवाईसाठी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आणि तालुक्याचे आमदार यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला होता.
तालुका लॉकडाऊन न करता काही नियम आणि अटीला अधीन राहून स्थानिक प्रशासनावर जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार सोमवार (दि. 6) पासून सोमवार (दि. 13) पर्यंत रोज सकाळी 6 ते 1 पर्यंत किराणासह अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर दुपारी एकनंतर मेडिकल व दवाखाने वगळता बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अनेक मोठ्या दुकानदारांनी सकाळी पासूनच दुकाने बंद ठेवून स्वयंघोषित बंद पाळला. तर विनाकारण शहरातून मास्क न लावता फिरणाऱ्या व दुचाकीवरून डबल, ट्रिपलसीट जाणाऱ्यांवर पोलीस, नगरपरिषदेने संयुक्तपणे कारवई केली.