मुंबई – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप झाले. वानखेडे यांनी मुस्लीम असताना मागासवर्गीय असल्याचा दाखला देत नोकरी मिळविण्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. या संदर्भात आता मोठं वृत्त आलं आहे.
समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. महापालिकेने तसं प्रतिज्ञापत्रच कोर्टात सादर केल्याची माहिती मिळाली आहे. पालिकेच्या दाव्यानुसार समीर वानखेडे जर मुस्लिम असतील तर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महापालिकेकडे वानखेडें यांच्या संदर्भातील कागदपत्रे मागवण्यात आली होती. आता वानखेडेंच्या कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी असल्याचं दिसून आलं आहे. महापालिकेने ही सर्व कागदपत्रं कोर्टात सादर केली आहेत.
समीर वानखेडे यांच्या सर्टिफिकेटमुळे त्यांच्याविरोधात निर्णय जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या मते तर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असल्याचा पालिकेने निष्कर्ष काढला असून ही कागदपत्रं कोर्टात सादर केली आहेत. पालिकेने कोर्टात कागदपत्रं सादर केल्याने उद्या कोर्टात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. आता ही कागदपत्रं समीर वानखेडे यांच्या वकिलांनी देखील देण्यात येणार आहे. यावर ते काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.