ठाणे – अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. वानखेडे यांच्याविरोधात ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन हॉटेलचा परवाना घेतल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या आरोपांनुसार, 1996-97 मध्ये वय 18 पेक्षा कमी असल्याने करार करण्यास पात्र नसतानाही समीर वानखेडेंनी ठाण्यातील सद्गुरु बार आणि रेस्तरॉंच्या करारनाम्यात स्टॅम्प पेपरवर आपले वय लपवले होते. याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी 2 फेब्रुवारीला समीर वानखेडेंच्या मालकीच्या सद्गुरु बार आणि रेस्तरॉंचा परवाना रद्द केला आहे. विशेष म्हणजे नवाब मलिक यांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.