कोल्हापूर – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी राज्याचा दौरा सुरू केला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे दर्शन घेऊन त्यांनी दौऱ्याला प्रारंभ केला. यावेळी वेगवेगळ्या समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे सर्वच आंबेडकरवादी संघटनांसह बारा बलुतेदार यांनीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिला. संभाजीराजे महाराष्ट्र दौऱ्यात मराठा समाजातील कार्यकर्त्यांना आणि तज्ज्ञांना भेटणार असून त्यांची चर्चा करून पुढील दिशा ठरवणार आहेत. मराठा आरक्षणाविषयी मते जाणून घेण्यासाठी व ती राज्य सरकार व केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र दौऱ्याला संभाजीराजेंनी सुरुवात केली आहे.
यातच ते बुधवारी औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आपण सध्या राज्यभरात फिरून मराठा समाजाच्या भावना जाणून घेत असल्याचे सांगितले. मी अनेक कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासकांना भेटत आहे. आता 28 तारखेला मी माझी अंतिम भूमिका स्पष्ट करेन, असे संभाजीराजे यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले,’सरकार पर्यंत विषय सांगायचं असल्याचं रस्त्यावर आंदोलन करावं लागतं. हे काही खुळं सरकार नाही ना, म्हणूनच ते सरकार झालं आहे. मी शिव शाहूंचा वंशज असून सामान्यांची काळजी करणं कर्तव्य आहे. करोना संकट असल्याने लोकांचा जीव धोक्यात घालू शकत नाही. आंदोलन करावं की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. सरकार कोणतीही दखल घेत नसेल तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करावंच लागेल.’
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. समाजाला आरक्षण मिळण्यासाठी काय करता येईल यासाठी सर्वांचे मत घेऊन 27 मे रोजी ते आपली सविस्तर भूमिका जाहीर करणार आहेत. त्याबाबत मराठासमाजामध्ये उत्सुकतेची भावना आहे. संभाजी राजे यांच्या या दौऱ्याकडे विविध राजकीय पक्ष लक्ष ठेवून आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन न करण्याचे आवाहन संभाजी राजे यांनी केले होते.
राजीनामा देण्याचा इशारा
राजीनामा देऊन जर मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल तर उद्या आपण खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याची भूमिका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी सोलापुरात पत्रकार परिषदेत मांडली. राज्य सरकारने आपल्या हातातील लाभ मराठा समाजाला द्यावेत, यासाठी आपण 28 मी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. त्याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा भेट घेणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले .