SambhajiRaje । राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राजकोटमधील पुतळा कोसळल्याने आता राज्यातील इतर पुतळ्यांविषयी सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. त्यासाठीच आज संभाजीराजे छत्रपती यांनी एक मोहीम सुरु केली आहे. त्यासाठी ते आज मुंबईत दाखल झाले असून त्यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे बांधकाम कुठपर्यंत आले आहे हे शोधण्यासाठी गेले आहेत. त्यावरून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला घेरले आहे.
“सरदार पटेल यांचा पुतळा झाला पण अजूनही छत्रपतींचा नाही ” SambhajiRaje ।
याविषयी रविवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी “अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा झाली तेव्हा आम्हाला आनंद झाला होता. देशाच्या आर्थिक राजधानीत शिवाजी महाराजांच्या किर्तीला साजेसं स्मारक होणं, ही अभिमानाची बाब होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवस्मारकाचं जलपूजन केले. मात्र, आता आठ वर्ष उलटल्यानंतरही शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. गुजरातमध्ये सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला पण महाराष्ट्रात अजून छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहिला नाही,” असे वक्तव्य केले.
समिती स्थापन होऊन काम का सुरु झाले नाही ? SambhajiRaje ।
संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधण्याची मोहीम आयोजित करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, पंतप्रधान मोदी यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं जलपूजन केल्यानंतर मी एक-दोन वर्षे थांबलो होतो. त्यानंतर मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि त्यानंतरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवस्मारकाबाबत विचारणा केली. शिवस्मारक बांधण्यासाठी समिती स्थापन होऊन काम का सुरु झाले नाही, असे मी विचारले. त्यावर मला सांगण्यात आलं की, अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या सगळ्या परवानग्या मिळालेल्या नाहीत. केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे. मग हा प्रश्न मार्गी का लागत नाही, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला.
तसेच पंतप्रधान हा देशाचा प्रथम नागरिक असतो. मग सर्व परवानग्या मिळाल्या नसता ते शिवस्मारकाच्या जलपूजनाला कसे आले? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवस्मारकाचं घाईगडबडीत जलपूजन करण्यात आले. त्यानंतर एल अँड टी कंपनीला टेंडर देण्यात आले. पण त्यानंतर 8 वर्षात पुढे काही घडलेच नाही. शिवस्मारकासाठीचे करोडो रुपये कुठे गेले? आम्ही शोधमोहीमेवेळी कायदा हातात घेणार नाही. पण आम्हाला समुद्रात जाऊ न देण्यासाठी बोटवाल्यांना भाजपकडून धमकावले जात आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. पण आम्ही शिवस्मारकाचं जलपूजन झालेल्या जागी पोहोचणारच, असा निर्धार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.