नांदेड : येथे रविवारी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला 53 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. शांताबाई शिवाजी मोरे असे या मयत महिलेचे नाव आहे. या घटनेवर छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, येथे सकाळी 10 वाजल्यापासून महिलांना सक्तीने बोलावण्यात आले होते.
यात एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र प्रशासनाने हा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असल्याचे सांगितले. तुम्ही पैसे द्या, त्यांच्या अकाऊंटवर टाका तुमचे कौतुक आहे. पण राजकीय स्टंट करू नका, अशी टीका छत्रपती संभाजीराजे यांनी महायुती सरकारवर केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी विधानसभा निवडणुकीवर मोठे वक्तव्य केले.
ते म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढवण्याचा आमचा मानस आहे आणि अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, आम्ही विस्थापित लोकांना संधी देणार आहोत. पण चांगले लोक प्रस्थापितांमधून आले तर त्यांचे पण आम्ही स्वागत करू. महाविकास आघाडी तसेच महायुती सरकारवर टीका करताना संभाजीराजे म्हणाले, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये गोंधळ सुरू आहे.
त्यांनाच माहीत नाही की त्यांचे नाराज लोक कुठे जाणार आहेत. थोड्या दिवसांत वेगळे चित्र दिसेल. मनोज जरांगे यांना मी विनंती केली आहे की पाडण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोण ठेवला पाहिजे.आपली लोक तुमच्या माध्यमातून असेल किंवा स्वराज्याच्या माध्यमातून असतील हे लोक विधानसभेच्या पटलावर आपला आवाज मांडू शकतील, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले आहेत.
मराठा आणि कुणबी एकच
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण टिकेल की नाही याबाबत समाज शाश्वत नाही. समाजाचा आग्रह होता मराठा कुणबी एकच आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळाले नाही. मी सुद्धा ही लढाई 2007 पासून लढत आहे. त्यामुळे 10 टक्के आरक्षण टिकेल की नाही माहीत नाही, असे संभाजीराजे म्हणाले आहेत.