MP Sanjay Raut | राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राजकोटमधील पुतळा कोसळल्याने आता राज्यातील इतर पुतळ्यांविषयी सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. त्यासाठीच आज संभाजीराजे छत्रपती यांनी एक मोहीम सुरु केली आहे. त्यासाठी ते आज मुंबईत दाखल झाले असून त्यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे बांधकाम कुठपर्यंत आले आहे हे शोधण्यासाठी गेले आहेत. त्यावरून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला घेरले आहे.
दरम्यान आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना याच मुद्यांवर भाजप पक्षावर निशाणा साधला आहे. पत्रकरांनी त्यांना स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे हे अरबी समुद्रात जाऊन स्मारकाची पाहणी करणार आहेत, याबद्दल विचारणा करण्यात आलाी. त्यावर संजय राऊतांनी भाष्य केले. छत्रपती शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत, त्या सर्वांनी यावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे राऊतांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले,’शिवाजी महाराजांचे स्मारक शोधण्याची जबाबादारी या देशातील 11 कोटी जनतेची आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या स्मारकाचं पूजन झालं होतं. यासाठी भाजपने फार मोठा गाजावाजा केला होता. जगातील फार मोठं स्मारक बांधू, असं भाजपने म्हटलं होतं. जर संभाजीराजे छत्रपती स्मारक शोधत असतील, तर त्यांना पाठिंबा आहे, असे राऊत म्हणाले. संभाजीराजेंना आमचा विरोध नाही, पण खरंतर त्यांच्यासोबत उदयनराजे भोसलेंनीही जायला हवं. जे कोणी छत्रपती शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत, त्या सर्वांनी यावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असेही राऊतांनी सांगितले.