कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा आरोप
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठे हनी ट्रॅप रॅकेट नुकतेच मध्य प्रदेशमध्ये उघडकीस आले आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींशी या हनी ट्रॅप रॅकेटचा थेट संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. आता या प्रकरणाचा संबंध थेट महाराष्ट्रातील एका नेत्याशी असल्याचे सांगण्यात येत आहे. कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी यावरुनच भाजपावर टीका केली असून त्यांनी या प्रकरणात भाजपाच्या काही मंत्र्यांची नावे घेत हे मंत्रीही या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे दिग्विजय सिंह यांनी खुलासा करताना महाराष्ट्रातील फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याचे नाव घेतल्याने सर्वत्र एकच गोंधळ उडाला आहे.
हनी ट्रॅप रॅकेटची मुख्य सुत्रधार असणाऱ्या श्वेता जैन हिने विशेष तपास पथकासमोर अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मध्य प्रदेशमधील भारतीय जनता पार्टीच्या युवामोर्चाच्या अध्यक्षपदी जितू जिराती होते तेव्हा या रॅकेटची मुख्य सुत्रधार श्वेता जैन ही युवा मोर्चाची सरचिटणीस होती. पत्रकारांनी श्वेताची अधिक माहिती काढल्यास बरेच खुलासे होतील, असे दिग्विजय यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. इतकंच नाही तर दिग्विजय सिंह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचाही प्रकरणामध्ये सहभाग असल्याचे म्हटले आहे. ज्यावेळी हे प्रकरण घडले तेव्हा निलंगेकर हे महाराष्ट्र युवा मोर्चाचे अध्यक्ष होते, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. जेव्हा श्वेताचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा ती महाराष्ट्रामध्ये कोणाबरोबर होती?, श्वेता आणि निलंगेकर यांचे काय संबंध आहेत हे प्रसारमाध्यमांनी शोधून काढावे, असेही दिग्विजय म्हणाले आहेत. संभाजी पाटील निलंगेकर हे सध्या राज्यातील फडणवीस सरकारमध्ये कामगारमंत्री आहेत. भाजपा नेते जितू जिराती यांनी दिग्विजय सिंह यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी राज्यातील युवा मोर्चाचा अध्यक्ष असताना श्वेता जैन सरचिटणीस नव्हती, असे जितू यांनी म्हटले आहे. या प्रकरणामध्ये मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारने चौकशी सुरु केली आहे.