नाशिक : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी हा लढा सुरु केला आहे. यादरम्यान मनोज जरांगे यांच्याविरोधात पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून ही शाईफेक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिकच्या सिडको भागात आयुर्वेद डॉक्टर विजय गवळी यांचं क्लिनिक आहे. या डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये घुसून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरांवर शाईफेक केली आहे. संभाजी ब्रिगेडने केलेल्या शाईफेकीनंतर डॉक्टर विजय गवळी यांनी माफी मागितली आहे.
काय म्हणाले डॉ. विजय गवळी?
‘मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे. माझ्याकडून नकळत चुकून एक व्हिडिओ पोस्ट झाला होता. माझ्याकडून हा व्हिडिओ नकळत आणि चुकून फॉरवर्ड झाला. मी स्वत: मराठ्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. माझ्याकडून जरांगे पाटलांचा अवमान करणारी पोस्ट चुकून पाठवली गेली आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो’, असे म्हणत डॉ. विजय गवळी यांनी माफी मागितली आहे.