पुणे – सुरळीत वाहतुकीसाठी डेक्कन परिसरातील संभाजी पूल (लकडी पूल) दुचाकी वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. सकाळी 8 ते रात्री 9.30 पर्यंत या पुलावरुन दुचाकी नेण्यास बंदी होती. नुकतेच वाहतूक पोलिसांनी याबाबतचे जुने निर्बंध हटवले आहेत. यामुळे आता संभाजी पुलावरुन दुचाकीस्वारांना वाहतूक करता येणार आहे.
दिवस असताना या पुलावरुन येणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाईसाठी वाहतूक पोलीस दबा धरून बसलेले असत. हा पूल दुचाकीसाठी खुला करावा, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. पावसाळ्यात मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. यामुळे अनेकदा डेक्कन नदीपात्रातील रस्ते आणि भिडे पूल वाहतुकीसाठी बंद होतो. यावेळी इतर रस्त्यांवर होणारी कोंडी विचारात घेता तात्पुरत्या कालावधीसाठी हा पूल दुचाकीसाठी खुला करण्यात येतो. मात्र, आता कायमस्वरूपी हा पुल खुला ठेवण्याबाबत परवानगी दिली आहे.
संभाजी पूल दुचाकींसाठी खुला करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. याबाबत नव्याने परिपत्रक काढण्यात आले असून दुचाकीस्वारांना पुलाचा वापर करता येणार आहे.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा