सांगली : बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरतेनंतर अराजकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्या ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडत आहेत. बांगलादेशमधील हिंसाचारात तिथल्या हिंदूंवर अत्याचार करण्यात आला. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कडून 25 रोजी कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठाननेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी हे बंदची हाक दिली असून या बंदसाठी 20 ऑगस्ट रोजी रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात असल्याचे संभाजी भिडे म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणावर केले मोठे वक्तव्य
राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. दरम्यान, अद्याप मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. ओबीसी आणि मराठा अशी संघर्षाची स्थिती राज्यात निर्माण झालीय. यावर बोलताना संभाजी भिडे गुरुजी म्हणाले की, मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. मराठा म्हणजे तुम्ही वाघ आणि सिंह आहात. संपूर्ण जंगल तुमचे आहे, मग आरक्षण मागावे का ? आरे मराठ्यांनी उभा देश चालवायचं आहे,आरक्षण कुठे घेऊन बसलाय? असे संभाजी भिडे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कौतुक
यावेळी संभाजी भिडे यांनी सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जरी चांगली असली तरी यामध्ये महिलांना मानधन देऊन नव्हे त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही याचीही व्यवस्था राज्य सरकारने करावी असे संभाजी भिडे म्हणाले.