‘संभाजी भिडेंनी भीमा-कोरेगावमध्ये वेगळे वातावरण तयार केले’

मुंबई – भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषद वेगवेगळं प्रकरण आहे. संभाजी भिडे आणि एकबोटे यांनी या आजुबाजुच्या गावात एक वेगळं वातावरण तयार केलं होतं. त्याचा परिणाम म्हणून ही हिंसा झाली, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले कि, केंद्र सरकारला एनआयए चौकशीचा अधिकार आहे. तसाच राज्याला पण अधिकार आहे. माझ्या मते भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद वेगवेगळं प्रकरण आहे. भीमा कोरेगाव हिंसेच्या आधी एल्गार परिषद झाली होती. ही फक्त पळवाट आहे. या सगळ्या प्रकरणात जी चौकशी झाली आहे. त्यामध्ये पुणे पोलिसांचा दृष्टीकोन चिंताजनक आहे. माझी मागणी एल्गार परिषदेच्या बाबतीत जो सत्तेचा गैरवापर झाला त्याची चौकशी करण्याची आहे. पुणे पोलिसांचं वर्तन आणि त्याच्या मागे असलेल्या लोकांची चौकशी झाली पाहिजे यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी आमची आहे.

एल्गार परिषदेतील काही लोकांचे साहित्यिक आक्रमक असले तरी त्यांना मी देशाच्या विरोधी म्हणणार नाही. तर संभाजी भिडे आणि एकबोटे यांनी या आजुबाजुच्या गावात एक वेगळं वातावरण तयार केलं होतं. त्याचा परिणाम म्हणून ही हिंसा झाली. संबंध नसलेल्या लोकांवर खटले भरले गेले. ज्यांचा एल्गार आणि भीमा कोरेगावचा काही संबंध नव्हता. एल्गार परिषदमध्ये उपस्थित नसलेल्यांवरही खटलं भरण्यात आले, असाही आरोप शरद पवार यांनी केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.