आळंदी -एम. डी. पाखरे
काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखीं वदविले ।।1।।
कोठवरी वानूं याची स्वरुप स्थिती । चालविली भिंती मृत्तिकेची ।।2।।
अविद्या मायेचा लागों नेदी वारा । ऐसें जगदोद्वारा बोलविलें ।।3।।
नामा म्हणे यांनीं तारिले पतित । भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ।।4।।
रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची मुक्त उधळण, टाळ-मृदंगाच्या साथीने अखंड नामघोष करीत भक्तिमय वातावरणात भाविक, वारकऱ्यांनी माऊलींचा लाकडी रथ नगरप्रदक्षिणेसाठी सोमवार (दि.21) सायंकाळी ओढला. तुळशी, गुलाब, झेंडूच्या फुलांचा हार घालून सजविलेले रथामधील माऊलींचे लोभस रूप प्रदक्षिणा रस्त्याच्या दुतर्फा उभ्या हजारो भाविकांनी डोळ्यांत साठविले. यावेळी माऊली…माऊली…असा जयघोष सुरू होता.
माऊलींचा आकर्षक चांदीचा मुखवटा ठेवलेली पालखी आळंदीकरांनी खांद्यावर घेतली. महाद्वार शनिमंदिर, झाडीबाजार, चाकण चौक मार्गाने गोपाळपुरात आणली. यावेळी दर्शनासाठी दुतर्फा गर्दी होती. गोपाळपुरात पालखी आल्यानंतर येथील गोपालविष्णू मंदिरात पालखी विसावली. याठिकाणी आरती, अभंग, पंचोपचार पूजा करण्यात आली. गोपालकृष्ण मंदिरात पूजन झाल्यानंतर माऊलींचा मुखवटा रथात ठेवण्यात आला. रथ गोपाळपुरातून प्रदक्षिणेसाठी पुढे मार्गस्थ झाला. प्रदक्षिणा मार्गाने रथ पुढे येऊन हजेरी मारुती मंदिर येथे विसावा झाला. नंतर अभंग होऊन हरिनाम गजरात पालखी मंदिरात पोहोचली. रथोत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संजीवन सोहळ्याची जय्यत तयारी
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 726 वा संजीवन समाधी सोहळा मंगळवार (दि. 22) होणार आहे. या पार्श्वभूमीवर समाधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला माऊली मंदिरात फुलांची आकर्षक सजावट येत होती. यावेळी माऊलींनी समाधी घेण्यासाठी जात असतानाचे प्रतीकात्मक चित्र फुलांच्या माध्यमातून साकारण्यात येत होते. तसेच संत नामदेव महाराज यांच्या अभंगाप्रमाणे बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ असे नाव आकर्षक फुलांमध्ये काढण्यात येत होते.
प्रदक्षिणा मार्ग फुलला
टाळ, पखवाज, ग्रंथ, देवतांच्या मूर्ती, प्रसाद, तुळशीमाळा विक्रीची दुकाने प्रामुख्याने मंदिर परिसरात आहेत. मंदिराच्या चोहीबाजूला 100 हून अधिक या साहित्यांची दुकाने आहेत. तसेच प्रदक्षिणा मार्ग, वडगाव रस्ता, मरकळ रस्ता, देहू रस्ता, पुणे रस्ता, पद्मावती रस्ता आदी ठिकाणी देखील या साहित्यांची छोटी मोठी दुकाने उभारण्यात आली आहेत. तसेच स्वेटर, खेळणी, ब्लॅंकेट आदी दुकाने प्रदक्षिणा मार्ग आणि इतर रस्त्यांवर मोठ्या संख्येने आहेत. सर्व शहरात या दुकानांची संख्या 1 हजारांच्या पुढे आहे.
आज संजीवन समाधी सोहळा
आळंदी- संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आज 726वा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्त सोमवारी माऊली मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्याचे काम सुरू होते. माऊलींच्या संजीवन सोहळ्यानिमित्त कार्तिक वद्य त्रयोदशी मंगळवार दि. 22 पहाटे 3 ते 4 वेळेत माऊली देवस्थानचे प्रमुख विश्वस्त यांच्या हस्ते पवमान अभिषेक व दुधारती होईल. सकाळी 5 ते 9.30 भाविकांच्या महापूजा होतील. सकाळी 7 ते 9 ह.भ.प. हैबतबाबा आरफळकर यांच्या वतीने हैबतबाबा पायरीपुढे कीर्तन होईल. सकाळी 7.30 ते 9.30 वीणा मंडपात कीर्तन होईल. सकाळी 7 ते 9 दाणेवाले निकम दिंडी यांच्या वतीने भोजलिंगकाका मंडपात कीर्तन होईल.
सकाळी 9 ते 11 तेथेच दुसरे कीर्तन होईल. सकाळी 10 ते दुपारी 12 ह.भ.प. नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन होईल. सकाळी 9 ते 10 महाद्वारकाल्याचे कीर्तनानंतर हैबतबाबा दिंडीची समाधी मंदिरात प्रदक्षिणा होईल. दुपारी 12 ते 12.30 माऊलींच्या 726 व्या संजीवन समाधी दिनानिमित्ताने घंटानाद, पुष्पवृष्टी, आरती व मान्यवरांना नारळप्रसाद वाटप होईल. दुपारी 12.30 ते 1 महानैवेद्य. सायं. 6.30 ते 8.30 ह.भ.प. सोपानकाका देहूकर यांच्यावतीने कीर्तन होईल. रात्री 9.30 ते 11.30 श्री. हरिभाऊ बागडे यांच्या वतीने कारंजा मंडपात भजन. रात्री 11.30 ते 12 धूपारती. रात्री 12 ते 4 हैबतबाबा आरफळकर यांच्या वतीने जागर होणार आहे.