‘पुनरागमनाय च’ या डॉक्युड्रामामधून पुणेकर आणि प्रशासनाला ‘सॅल्युट’

  • पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (IPS) यांचे विशेष मार्गदर्शन
  • युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन स्टुडिओज’ची जनहितार्थ निर्मिती
  • बॉलीवूडचे सुप्रसिद्ध डिओपी महेश लिमये यांचे छायांकन आणि दिग्दर्शन

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात एक प्रकारचे मंतरलेले, भारावलेले वातावरण बघायला मिळते. दरवर्षी जगभरातील गणेशभक्त, पर्यटक गणेशोत्सव अनुभवण्यासाठी शहरात येतात. गणरायांच्या आगमनाचा जल्लोष, आनंद गणेशभक्तांच्या मनात जेवढा असतो त्याहून अधिक उत्कट भावना श्रीं च्या विसर्जन मिरवणुकीत दिसतात. २०२० वर्ष मात्र या आनंदोत्सवाच्या १२९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अनेक बाबींसाठी अपवादात्मक राहिले, ते कोरोना विषाणूच्या संकटामुळे.

या संकटकाळात अतिशय संयमाने उत्सव साजरा करणार्‍या लाखो पुणेकरांना, डॉक्टर्स, पोलीस व पालिका प्रशासनाच्या अतुलनीय कामगिरीला पुनीत बालन स्टुडिओज निर्मित आणि महेश लिमये दिग्दर्शित “पुनरागमनाय च- गणेशोत्सव २०२०, एक उत्सव मनात राहिलेला” या जनहितार्थ तयार केलेल्या डॉक्युड्रामा मधून ‘सॅल्युट’ करण्यात आला आहे. या डॉक्युड्रामासाठी पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (IPS) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

या डॉक्युड्रामा बद्दल बोलताना महेश लिमये म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे पाच लाख घरगुती आणि साडेचार ते पाच हजार मंडळांच्या गणपतींचे साध्या पद्धतीने विसर्जन झाले. यामुळे पुणेकरांच्या शिस्तीला ‘सॅल्युट’ आणि प्रशासनाचे आभार मानणारा डॉक्युड्रामा करावा अशी संकल्पना निर्माते पुनीत बालन, लीड मीडियाचे विनोद सातव यांनी मांडली. यंदा पोलीस, पालिका प्रशासन यांनी केलेल्या आवाहनाला गणेशभक्तांनी उत्तम सपोर्ट केला.

यंदाच्या वर्षी बाप्पा एका वेगळ्या प्रकारे अनुभवता आले, पण पुढच्या वर्षी वाजत गाजत या, दरवेळी जो थाट असतो तो तसाच राहुदे, ही भावना ‘पुनरागमनाय च’ या टायटल मधून व्यक्त होते. २०२० चा गणेशोत्सव ‘न भूतो न भविष्यती’ असा वेगळा ठरला, भविष्यात ५०- १०० वर्षानी जेव्हा हा डॉक्युड्रामा बघितला जाईल त्यावेळीही आजच्या परिस्थितीची जाणीव यातून होईल.

निर्माते पुनीत बालन म्हणाले,‘पुनरागमनाय च’ या आम्ही जनहितार्थ निर्मिती केलेल्या डॉक्युड्रामाचे लोकार्पण करताना आनंद होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करणे हे आव्हान होते. मात्र पुणेकरांनी अतिशय संयमाने आणि शिस्तीने उत्सव साजरा केला. ऐतिहासिक परंपरा, मनातील भावना याला मुरड घालत पुणेकरांनी प्रशासनाला केलेले सहकार्य कौतुकास्पद आहे.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सुमारे 20 लाखाहून अधिक नागरिक मध्यवर्ती भागात गणपतीच्या दर्शनाला येतात यंदा मात्र त्यांनी घरी राहून ऑनलाईन दर्शन घेतले, प्रशासनाला सहकार्य केले. मंडळाच्या मांडवात किंवा घरच्या घरी साध्या पद्धतीने गणरायांचे विसर्जन ही गोष्ट ऐतिहासिक परंपरा असलेल्या गणेशोत्सवाच्या विधायकतेला अधिक उंचीवर घेऊन गेली. लवकरच नवरात्रोत्सव येत आहे, त्या काळातही पुणेकर असेच सामाजिक जबाबदारीचे भान राखतील असा विश्वास आहे.

‘पुनीत बालन स्टुडिओज’ची जनहितार्थ निर्मिती असलेल्या ‘पुनरागमनाय च’ या डॉक्युड्रामाची संकल्पना निर्माते पुनीत बालन, लीड मीडियाचे विनोद सातव यांची आहे, छायांकन आणि दिग्दर्शन बॉलीवूडचे सुप्रसिद्ध डिओपी महेश लिमये यांनी केले आहे तर क्षितिज पटवर्धन यांनी लेखन केले आहे.

अभिनेते सचिन खेडेकर यांचा भारदस्त आवाज व्हॉइस ओव्हरच्या रूपात ऐकायला मिळणार आहे, संगीत व पार्श्वगायन केदार भागवत यांचे असून संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (IPS) यांचे विशेष मार्गदर्शन लाभलेल्या या डॉक्युड्रामाचे कार्यकारी निर्माते अश्विनी तेरणीकर, कुशल कोंडे आहेत. ‘पुनरागमनाय च’ हा डॉक्युड्रामा ‘पुनीत बालन स्टुडिओज’चे युट्यूब चॅनल, फेसबुक, इनस्टाग्राम पेज आणि पुणे पोलिसांच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर विनामूल्य पाहता येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.