‘आमचे महत्व मीठासारखे’; राज्यसभेची जागा गेल्यावरही ‘लोजप’त नाराजी नाही

नवी दिल्ली – रामविलास पासवान यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी भारतीय जनता पार्टीकडून सुशील कुमार मोदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोदी यांना उमेदवारी देण्यास आमचा आक्षेप नाही. आज नाही तर उद्या आमचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केलाच जाईल. कारण राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आमचे महत्व अन्नातील मीठासारखे आहे, अशी प्रतिक्रिया लोकजनशक्ती पक्षाचे नेते अब्दुल खालिक यांनी दिली आहे.

एका वृत्तपत्राशी बोलताना खालिक म्हणाले की, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अगोदर भाजपने आम्हाला शब्द दिला होता की, आम्हाला राज्यसभेची एक जागा सोडली जाईल. मात्र ती जागा बिहारमधूनच दिली जाईल असे त्यांनी म्हटले नव्हते. आता बिहारमधून सुशील मोदी यांना उमेदवारी दिली असेल तर त्याला आमचा आक्षेप नाही. भाजपशी आमचे संबंध अगोदरप्रमाणेच चांगले आहेत.

खालिक पुढे म्हणाले की, केंद्र सरकारमध्ये भाजपच्या बाहेरची केवळ एकच व्यक्ती आता मंत्रिपदावर असून त्यांचे नाव रामदास आठवले आहे. आम्ही गृहमंत्र्यांशीही बोललो. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आमचे महत्व मीठासारखे आहे. आम्हाला आज ना उद्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे.

बिहारच्या राजकारणात लोकजनशक्ती पक्षाला कायमच महत्व राहीले आहे. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा भाजपचा पराभव झाला होता, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनीही आमचे महत्व अधोरेखित केले होते. तेव्हा आम्ही संयुक्त पुरोगामी आघाडीचे घटक होतो. जेव्हा आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत दाखल झालो तेव्हा रालोआची कामगिरी चांगली झाली.

खालिक म्हणाले की 2014 च्या निवडणुकीत लोजपने 7 पैकी 6 तर 2019 च्या निवडणुकीत 6 पैकी 6 जागा जिंकल्या. आमच्या पक्षाचे भवितव्य चांगले आहे. आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे व चिराग पासवान चांगले नेते आहेत. ते लवकर लोकांमध्ये मिसळून जातात आणि लवकरच ते पक्षाची नवी रचना करतील.

केवळ बिहारच्या विधानसभा निकालांवरून लोजपचे मूल्यांकन केले जाउ नये, तर आम्हाला असलेले जनसमर्थनही पाहिले जावे. रामविलास पासवान यांच्या निधनाने पक्षाचे नुकसान झाले आहे. मात्र राज्यात राष्ट्रीय जनता दलाचे डावपेच चालणार नाहीत, कारण आम्ही रालोआसोबत ठामपणे उभे आहोत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.