सालसा होणार सानियाची वारसदार

सानिया मिर्झा यशस्वी होते आणि तिच्याकडून प्रेरणा घेत भारतात शेकडो मुली टेनिसच्या खेळाकडे वळतात आणि त्यात नावारूपालाही येतात. पुण्याच्या सालसा आहेर या खेळाडूने देखील हाच कित्ता गिरवला आणि तिचे स्वप्न पूर्ण झाले. तिने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या ज्युनिअर गटातही पदार्पण केले. आता येत्या काही दिवसांत ती अमेरिकेतून मायदेशी परतेल व त्यानंतरच तिच्या पुढील वाटचालीवर प्रकाश टाकता येणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिरीज स्पर्धेत तिने विजेतेपद मिळवले आणि आपले सातत्य दाखवून दिले. डावखुरी खेळाडू असलेली सालसा हार्ड कोर्टवर जास्त तुल्यबळ वाटते. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने सालसाला वार्षिक शिष्यवृत्ती बहाल केली आहे. 2006 मध्ये तिने टेनिसचे प्राथमिक धडे गिरवायला सुरुवात केली. तिने नामांकित प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. ती काही काळ रोहिणी लोखंडे, हेमंत बेंद्रे व संदीप कीर्तने यांच्याकडेसुद्धा मार्गदर्शन घेत होती. कौटुंबिक पार्श्‍वभूमी क्रीडा क्षेत्राची नसली तरी तिचे आई-वडील सालसाला आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून प्रस्थापित झालेली पाहण्यासाठी सर्वतोपरी धडपड करीत आहेत.

डब्ल्यूटीए फ्युचर स्टार स्पर्धेत सालसाला फ्रान्सची मानांकित खेळाडू कॅरोलीन गार्सिया हिने तिची गुणवत्ता पाहून स्वतःची रॅकेट बक्षीस म्हणून दिली. ही शाबासकी सालसाला पुढील वाटचालीसाठी खूपच प्रेरणादायी ठरली. सालसाने कोणताही अनुभव नसताना पाचगणीला झालेली स्पर्धा सर्वप्रथम खेळली. त्यात जरी ती पराभूत झाली तरी तिथूनच “पराभव ते यशोशिखर’ असा तिचा प्रवास सुरू झाला होता. 2013 साली कोल्हापूरला झालेली 14 वर्षांखालील स्पर्धा तिने केवळ 12 व्या वर्षी जिंकली आणि आजपर्यंत ती यशाची एक एक शिखरे चढते आहे. आजवर एकेरी आणि दुहेरी अशा मिळून 60 ते 65 स्पर्धा तिने जिंकल्या आहेत. आता तर ती केवळ भारतात राष्ट्रीय स्पर्धाच खेळते आणि बहुतांशी स्पर्धा परदेशात खेळते.

सालसाने गतवर्षी फेडरेशन चषक स्पर्धेत निवड झाल्यामुळे 10 वीच्या परीक्षेतून अंग काढून घेतले होते आणि ती स्पर्धेत सहभागी झाली. तिच्या या निर्णयाला तिची शाळा सिंबायोसिस स्कूलने देखील पाठिंबा दिला होता. कारकिर्दीच्या प्रारंभी तिला डेंगू झालेला असताना काही स्पर्धेतून माघार घ्यावी लागली त्यामुळे तिचे रॅकींग घसरले होते. मात्र, पूर्ण तंदुरूस्त झाल्यानंतर तिने सिंगापूरमध्ये झालेली फ्युचर स्टार स्पर्धा गाजवत अंतिम फेरी गाठली आणि आपण पुन्हा भरात येत असल्याचे सिद्ध केले. 2014 साल तिच्यासाठी खऱ्या अर्थाने यशस्वी ठरले होते. राजधानीत झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही गटात उपविजेतेपद मिळवले होते. याच कामगिरीमुळे तिची “भारताचे भविष्य’ म्हणून ओळख निर्माण झाली.

सानिया मिर्झाने जसे ज्युनिअर ग्रॅण्डस्लॅममधून आपली कारकीर्द घडवली त्याच मार्गावर सालसाचा प्रवास सुरू आहे. तिची गुणवत्ता, मेहनत करण्याची वृत्ती यांच्या जोरावर येत्या काळात भारताला सालसाच्या रूपाने एक नवीन आंतरराष्ट्रीय आणि दर्जेदार टेनिसपटू मिळेल याची खात्री वाटते. कारकिर्दीचा सुरुवातीला पहिलीच स्पर्धा ती कोल्हापूरमध्ये खेळली आणि अभिमानास्पद कामगिरी करत तिने ही स्पर्धा जिंकलीदेखील. यानंतर तिने वळून पाहिलेच नाही आणि ज्युनिअर गटात यशाची कित्येक शिखरे पादाक्रांत करत आहे. पुरुषांचा जसा डेव्हिस करंडक असतो त्याच धर्तीवर महिलांसाठी फेड कप स्पर्धा असते.

तिने भारतातील स्पर्धा खेळणे कमी केले आहे तर एआयटीए व डब्ल्यूटीए स्पर्धांवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. ती सध्या परदेशात देखील आठ ते दहा स्पर्धा खेळते. एशियन बी वन स्पर्धेत पात्रता फेरीत एक सामना गमावूनही ती लॉटरी पद्धतीतून पुन्हा एकदा स्पर्धेसाठी पात्र ठरली. सिंगापूरमधील स्पर्धेतही सोळा वर्षांखालील स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत गेली. तिची अशीच घोडदौड तिला उज्ज्वल भवितव्य घडवायला मदत करेल. आजवरच्या कारकिर्दीत तिने एकेरीची सत्तावीस तर दुहेरीची अठरा विजेतेपद प्राप्त केली आहेत. लक्ष्य या संस्थेची तिला सुरुवातीला मदत मिळाली. मात्र, आता ती स्वावलंबी बनली आहे. तिला केंटुकी विद्यापीठाकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे ती आत्मनिर्भरही बनली आहे. सालसाला महाराष्ट्र लॉन टेनिस संघटनेनेही खूप मदत केली हे देखील नाकारता येणार नाही. संघटनेची व्हीजन प्लेअर म्हणून तिला योग्य तो पाठिंबाही मिळाला.

पुण्यात डेव्हिस करंडक स्पर्धा बालेवाडीत आयोजित करण्यात आली होती, त्यात लिएंडर पेससह देशाचे सर्व मानांकित खेळाडू सहभागी झाले होते. या
स्पर्धेने खऱ्या अर्थाने पुण्यात टेनिस संस्कृती रूजवली. सालसा सारख्या खेळाडूंनादेखील अशा स्पर्धा प्रेरणा देत असतात. थायलंडच्या आयटीएफ स्पर्धेत जे उपविजेतेपद मिळवले होते ते सालसाच्या कारकिर्दीचा कळसाध्याय ठरला आहे. भारतासारख्या देशात दहावी आणि बारावीच्या परीक्षा आल्या की पालकवर्ग आपल्या मुलांचे खेळ बंद करतात व अभ्यास एके अभ्यास करायला भाग पाडतात. याच कारणाने आपल्याकडे ड्रॉपआऊटचे प्रमाण खूप जास्त आहे. परीक्षेचे दडपण घेत खेळाडू खेळाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात व त्यात निघून जाणारे एक वर्ष त्यांच्या कारकिर्दीला “फुलस्टॉप’ देणारे ठरते. असे अनेक खेळाडू गुणवत्ता असूनही खेळापासून दूर गेलेले पाहायला मिळतात. नशिबाने सालसाला असे पालक मिळाले आहेत की ज्यांचा तिच्या खेळावर, गुणवत्तेवर पूर्ण विश्‍वास आहे. म्हणूनच फेड स्पर्धेसाठी त्यांनी दहावीच्या परीक्षेलाही मागे टाकले. हाच विश्‍वास एका सामान्य खेळाडूला महान खेळाडू बनवतो.

सचिनमुळे लहान मुले क्रिकेट खेळू लागली, सायना नेहवालमुळे मुली बॅडमिंटन तशाच धर्तीवर सानिया मिर्झाकडे बघत सालसासारख्या असंख्य मुली टेनिसकडे वळत आहेत. त्यात सालसा जास्त आश्‍वासक आहे. तिच्याच रूपाने देशाला सानिया मिर्झाची वारसदार मिळावी ही अपेक्षा आहे. सध्या अमेरिकेत विविध स्पर्धांमध्ये एकदा का जागतिक स्तरावर सालसाची गुणवत्ता सातत्याने सिद्ध झाली तर, केवळ पुण्याच्याच नव्हे तर देशाच्या टेनिसचे नवे आशास्थान सालसा बनलेली असेल.

– अमित डोंगरे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.