मुंबई – लॉकडाऊनमुळे बंद असलेला सलून व्यवसाय अखेर पुन्हा सुरु होणार आहे. येत्या रविवारपासून म्हणजे 28 जूनपासून सलून आणि जीम सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील सलून व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अनिल परब म्हणाले, सलून चालकांना सध्या फक्त केस कापण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. थोडे दिवस निरीक्षण केल्यानंतर यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
अनिल परब यांनी निर्णयाबद्दल बोलताना सांगितले की, 28 जूनपासून सलून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सलूनमध्ये फक्त केस कापण्यात येतील. पण दाढी करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. सोबतच केस कापणारा आणि केस कापून घेणारा दोघांनाही मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. ब्युटीपार्लर, स्पा आणि जीमबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. थोडे दिवस पाहणी करुन नंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, अनलॉकिंगनंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत करत असताना काही नियम पाळून सलून व्यावसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी काही दिवसांपासून सलून व्यावसायिकांनी केली होती. एकीकडे अन्य व्यवसायांना परवानगी दिली असताना, सलून व्यवसायाला परवानगी का नाही असा सवाल नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी विचारला होता. यावर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येत्या चार-पाच दिवसांत सलून सुरु करण्याबाबत निर्णय होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता सलून सुरु करण्याचा निर्णय राज्य सराकरने घेतला आहे.
“आशा’ सेविकांच्या मानधनात वाढ
करोनामुळे उद्भवलेल्या संकटात राज्य सरकारने आशा सेविकांनाही मदतीसाठी घेतले आहे. त्यामुळे आशा सेविकांना देण्यात येणारा मोबदला वाढविण्यात यावा, या मागणीवर अखेर राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. आशा सेविकांच्या मानधनात दरमहा 2000, तर आशा गटप्रर्तकांना मानधनात दरमहा 3000 अशी वाढ करण्यात आली आहे. आशा सेविकांच्या मानधनवाढीसाठी 157 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तशी तरतूदही करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या सुमारे 65 हजार आशा सेविका कार्यरत आहेत. या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.