चंद्रपूर – राज्यात 4 टप्प्यांतील लॉकडाऊनंतर आता अनलॉकचा पहिला टप्पादेखील आला. मात्र, अद्यापही सलून चालकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे सलून व्यवसाय ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील ऊर्जानगर-नेरी येथे राहणाऱ्या सलून चालकाने आर्थिक तंगीला कंटाळून आत्महत्या केली. यामुळे चंद्रपूरमध्ये एकच खळबळ उडाली. स्वप्निल चौधरी असे या 27 वर्षीय सलून चालकाचे नाव आहे. त्याने घरीच गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
मृत सलून चालकाच्या आई-वडिलांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते. यानंतर त्याने शहराच्या आयप्पा मंदिराजवळ छोटे सलूनचे दुकान सुरू केले होते. त्याच्यावरच त्याचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, लॉकडाऊनमुळे मागील मोठा काळ त्याला आर्थिक तंगीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. अखेर त्याने याला कंटाळून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. या घटनेचा अधिक तपास दुर्गापूर पोलीस करत आहेत.