पुणे – शहरात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर (कंटेन्मेंट झोन) सलून आणि ब्यूटीपार्लरचे टाळे उघडण्यास महापालिकेनेही मान्यता दिली आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश शनिवारी दुपारी काढले आहेत. त्यामुळे उद्या ( रविवार ) पासून सलून व्यवसाय सुरू होण्याचा मार्ग मोक़ळा झाला आहे. मात्र, दुकाने सुरू करताना, ग्राहकांची पूर्वनियोजित वेळ निश्चित करून आणि केस कापण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही सेवा देण्यास बंधने घालण्यात आली आहे. राज्यात मिशन बिगिन अगेन सुरू झाल्यानंतर बहुतांश व्यवसायांना परवानगी देण्यात आली असली तरी, सलून मात्र बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे नाभिक समाजाकडूनही नाराजी व्यक्त करत शासनाने इतर व्यावसाया प्रमाणेच या व्यावसायाला परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र, त्याच वेळी राज्याच्या वेगवेगळया भागात नाभिक व्यावसायिकांच्या आत्महत्यांचे सत्रही सुरू झाले होते. त्यानंतर अखेर राज्यशासनाने दोन दिवसांपूर्वी राज्यातील सलून पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली होती. मात्र, शासनाचा लेखी आदेश आल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. अखेर शासनाचे आदेश शनिवारी सकाळी प्राप्त होताच, महापालिकेकडून रविवारपासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सलून व ब्यूटी पार्लर सुरू करण्यास मुभा दिली आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी केवळ केस कापण्यास मुभा देण्यात आली आहे.
हे आहेत नियम
* ग्राहकांना पूर्वनियोजित वेळ द्यावी प केवळ केस कापणे, डाय करणे व वॅक्सिंग तसेच थ्रेडिंग करता येईल
* कामगारास मास्क, ऍपरन, हातमोजे वापरणे बंधनकारक
* दुकान प्रत्येक दोन तासांनंतर सॅनिटाईज करणे
* ग्राहकांसाठी एकदाच वापरता येणारा डिस्पोजल नॅपकिन वापरावा
* जी उपकरणे डिस्पोजल करता येणार नाहीत ती प्रत्येक वेळी सॅनिटाईज करावी
* उपाय योजनांची माहिती दर्शनिय भागात लावावी