दिल्ली दंगलप्रकरणी सलमान खुर्शिद यांच्यावर ठपका

नवी दिल्ली – दिल्ली दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांनी नव्याने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांच्यावर ठपका ठेवला आहे. प्रक्षोभक भाषणे दिल्याबद्दल खुर्शिद यांचे नाव आरोपपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. 

दिल्ली दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 17 सप्टेंबर रोजी तब्बल 17 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ‘उमर खलिद, सलमान खुर्शिद, नदीम खान इत्यादींनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान प्रक्षोभक भाषणे दिली होती. त्यामुळे नागरिकांच्या भावना भडकवल्या गेल्या, असे या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. मात्र या प्रक्षोभक भाषणांच्या नेमक्‍या स्वरूपाचा उल्लेख पोलिसांनी केलेला नाही.

संबंधित साक्षीदार हा दंगल घडवण्यासाठीचे कारस्थान घडवणाऱ्यांपैकीच असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. यासंदर्भात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोरच जबाब नोंदवण्यात आला आहे. सलमान खुर्शिद यांनी आंदोलनाच्या ठिकाणी प्रक्षोभक भाषणे दिल्याचे या प्रकरणातील आणखी एका आरोपीनेही पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात सांगितले आहे.

मात्र, अशाप्रकारे साक्षीदारांची वक्‍तव्ये गोळा करून वक्‍तव्याचे समर्थन करता येऊ शकेल. मात्र, प्रक्षोभक वक्‍तव्य म्हणजे काय, असा सवाल खुर्शिद यांनी विचारला आहे.

आपल्याविरोधात कचऱ्यासारखा पुरावा गोळा केला जात आहे. मात्र, या कचऱ्याचा काहीही उपयोग नाही. जर भाषण प्रक्षोभक होते, तर पोलिसांनी त्याविरोधात कारवाई का केली नाही? ज्या अर्थी पोलिसांनी दखल घेतली नाही, त्या अर्थी ते प्रक्षोभक नव्हते, असेही खुर्शिद यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.