मुंबई – वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेते, लेखक व दिग्दर्शक ‘प्रविण विठ्ठल तरडे’ आपल्या आगामी “धर्मवीर’ सिनेमातून कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणार्या ‘आनंद दिघे’ यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर दाखवणार आहेत. मंगेश देसाई या सिनेमाची निर्मिती करणार आहे. नुकतंच प्रवीण तरडे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला.
धाक, आदरयुक्त दरारा, समोरच्यांच्या उरात धडकी भरवणारी तिक्ष्ण नजर, अन्याय करणाऱ्याच्या पाठीवर आसूड ओढणारे, ठाण्याचा वाघ अशी ख्याती असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर एक भव्य सिनेमा येणार आहे. “धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’ असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमातून आनंद दिघे याच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.
नुकतंच ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते सुपरस्टार सलमान खानपर्यंत या इव्हेंट पार्टीत दिसले. याशिवाय इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी दिसले जे या चित्रपटाला खूप सपोर्ट करताना दिसले.
सलमान खान यावेळी म्हणाला,’मी आता मराठीत बोलणार आहे. माझे नाव सलमान खान आहे आणि मला हा ट्रेलर फार आवडला. मी आता जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करत होतो, त्यावेळी त्यांनी दिघे साहेबांबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या.’
तो पुढे म्हणाला,’यातल्या काही गोष्टीत मला माझ्यात आणि त्यांच्या साम्य जाणवले. त्यातील एक म्हणजे ते एका बेडरुममध्ये राहायचे आणि मी देखील एकाच बेडरुममध्ये राहतो. दुसरं म्हणजे त्यांचेही लग्न झालेले नव्हते आणि माझेही झालेले नाही.” असे तो म्हणाला.
दरम्यान, ट्रेलरच्या सुरुवातीला “कुठल्याही बँकेत अकाऊंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असलेला. जगातला सर्वात श्रीमंत असलेला राजकारणी.. या महाराष्ट्राने पाहिला आहे. तर जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचा…” हे डायलॉग ऐकायला येतात. सिनेमाचा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश ओकचा लूक आहे. ‘प्रसाद ओक’ला पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला आनंद दिघे यांची आठवण येईल. ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.