मुंबई – बॉलिवूडचा दबंग सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका पत्राद्वारे अभिनेत्याला ही धमकी देण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, सलमान खानचे वडील सलीम खान सकाळी फिरायला गेले होते. यादरम्यान ते विश्रांती घेण्यासाठी बाकावर बसले असताना त्यांना सलमानच्या नावाने धमकीचे पत्र मिळाले.
या पत्रात सलमानला धमकी देताना लिहिले होते की, सलमान खानलाही मूसेवालासारखे मारण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, सलीम खान यांना हे पत्र संध्याकाळी मिळाले. सध्या हे पत्र समोर आल्यानंतर वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले आहे. लॉरेन्सने याआधीच सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर मुंबई पोलिसांनी अलीकडेच सलमानची सुरक्षा वाढवली होती. मात्र आता पुन्हा एकदा नवीन धमकी मिळाल्याने सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.