मुंबई – अभिनेता सलमान खान एक प्रसिद्ध सेलिब्रेटी असला तरी समाजात वावरताना तो सामाजिक भान राखतो. याचाच प्रत्यय सध्या व्हायरल झालेल्या सलमानच्या काही फोटोजवरून येत आहे. सलमान खान सध्या विशाखापट्टणममध्ये आहे. तो त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तेथे गेल्याचे समजते. विशाखापट्टणममधील सलमान खानचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये सलमान काही जवानांसोबत असल्याचे दिसून येते.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सलमान भारतीय नौदलाच्या जवानांच्या मध्यभागी असल्याचे दिसते. सलमान खानने आपला संपूर्ण दिवस नौदलाच्या जवानांसोबत घालवला आणि त्यांच्यासोबत खूप मजा केल्याचे समजते. विशेष म्हणजे सलमानने यावेळी केवळ सेलिब्रेटी म्हणून न राहता जवानांना कामात काही मदत केल्याची देखील फोटोंवरून समजते.
सलमानने यावेळी पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली आहे. यासोबतच त्याने भारतीय नौदलाची टोपीही घातली आहे. हातात तिरंगा घेऊन सलमानने जवानांसोबत काही वेळ घालवल्याचे समजते. सलमान खानने नौदलाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक गोष्टी शेअर केल्या. यावेळी त्याने जहाजात अन्न शिजवण्यासह सैनिकांना येणाऱ्या समस्यांबाबतही माहिती घेतल्याचे समजते. फोटोमध्ये सलमान खान स्वतः जवानांसाठी रोटी बनवताना दिसत आहे.
सलमान खान लवकरच टायगर 3 या चित्रपटात दिसणार आहे. सलमान पुढील महिन्यात त्याच्या भाईजान चित्रपटाच्या पुढील शेड्यूलचे शूटिंग करणार आहे.सलमानच्या या जवानांसोबतच्या कृतीनंतर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याचे कौतुक देखील केले आहे.