बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि कतरिना कैफ लवकरच आपल्या सुपरहिट फॅंचाइजी “टायगर’च्या पुढील सिक्वलमध्ये झळकणार आहे. या चित्रपटातील काही सिन तुर्कीत सूट करण्यात येणार असल्याने
सलमान आणि कतरिना हे तुर्कीत दाखल झाले आहेत. “टायगर-3’च्या शूटिंगच्या काळात सलमान खान, कतरिना कैफ आणि चित्रपटाच्या टीमने तुर्कीचे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री मेहमत नूरी इरसॉय यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सलमान आणि कतरिनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तुर्कीचे मंत्री मेहमत नुरी यांनीही सोशल मीडियावर हे विशेष भेटीचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी पोस्ट लिहिली की, बॉलीवूडमधील सुपरस्टार कलाकार सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्याशी आमची भेट झाली आहे.
जे आपल्या देशात त्यांच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करण्यासाठी आले आहेत. या प्रकारे तुर्की आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रोजेक्ट्सची मेजवानी करत आहे.
या फोटोंमध्ये सलमान खान हा ब्लॅक सूट आणि कतरिना ही बेज टॉप आणि ब्लॅक पॅट्समध्ये दिसत आहे. “टायगर-3’चे रशियातील शेड्यूल पूर्ण केल्यानंतर सलमान आणि कतरिना कैफ पुढील शेड्यूल पूर्ण करण्यासाठी तुर्कीला पोहोचले आहेत.