बॅटरीशिवाय इलेक्‍ट्रिक वाहन विक्री

इलेक्‍ट्रिक वाहनांच्या दरात कपात होण्याची शक्‍यता 

नवी दिल्ली – इलेक्‍ट्रिक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने बॅटरीशिवाय इलेक्‍ट्रिक वाहन विक्रीला परवानगी दिली आहे. 

या निर्णयाबद्दल पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्‍त केले असून या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे दुचाकी आणि तीनचाकी इलेक्‍ट्रिक वाहनांच्या किमतीत थोडीफार घट होऊ शकते. यासंबंधात केंद्र सरकारने, वाहतूक विभाग व वाहतूक आयुक्तांना पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे की, देशात इलेक्‍ट्रिक वाहननिर्मिती आणि विक्री वाढावी यासाठी आवश्‍यक वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. याच्याशी संबंधित सर्व संस्थांनी एकत्र येऊन ही विषयपत्रिका पुढे नेण्याची गरज आहे. यामुळे क्रूड ऑईलची आयात कमी होईल व पर्यावरणाची हानी टळेल. नव्यानेच विकसित होणाऱ्या या वाहन उद्योगाला सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शोरूम मधून इलेक्‍ट्रिक वाहन विकताना या वाहनाची किंमत पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी इंधनावरील दुचाकी आणि तीनचाकी वाहनापेक्षा कमी दिसणार आहे. वाहनांची बॅटरी नंतर ग्राहक बॅटरी उत्पादक, वाहन उत्पादक किंवा ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांकडून घेऊ शकतात. बॅटरीशिवाय घेतलेल्या वाहनांची नोंदणी करताना आता बॅटरी संबंधातील तपशील देण्याची गरज नाही. काही कंपन्यांनी या अगोदरच वाहन विक्री वेळी बॅटरीशिवाय वाहन विकण्याची परवानगी दिलेली आहे. या वाहनाच्या बॅटऱ्या ग्राहक कंपन्यांकडून भाड्याने घेऊ शकतात.

काय फरक पडणार आहे
मात्र, सरकारने या घेतलेल्या निर्णयामुळे काय फरक पडणार आहे, असा सवाल एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. वाहन बॅटरीवर चालू शकणार नाहीत आणि वेगळी बॅटरी विकत घ्यावीच लागणार आहे. त्याची किंमत ग्राहकाला मोजावी लागणार आहे, असे अधिकारी म्हणाले.

केंद्राच्या निर्णयाचे वाहन उद्योगांकडून स्वागत
केंद्र सरकारने या निर्णयाचे इलेक्‍ट्रिक वाहन क्षेत्रातील काही कंपन्यांनी स्वागत केले आहे. हिरो इलेक्‍ट्रिक या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मुंजाळ म्हणाले की, ही वाहने सर्वसामान्यांना परवडणारी व्हावी त्या दृष्टिकोनातून उचललेले हे एक छोटेसे पाऊल आहे. मात्र, आगामी काळात ही वाहने परवडणारी व्हावी यासाठी सरकारबरोबरच कंपन्यांनी सहकार्याने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या वाहनांची बॅटरी महाग असते.

Leave A Reply

Your email address will not be published.