नवी दिल्ली – केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या अनुदानात भरीव वाढ केली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीस मदत होईल असे फिक्की या उद्योजकांच्या संघटनेने म्हटले आहे. सरकारने दिलेले वाढीव अनुदान फक्त दुचाकीस दिले आहे. इतर वाहनासाठीही अशा उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
इलेक्ट्रिक दुचाकीसाठी ज्याप्रमाणे अनुदान वाढविले आहे त्याप्रमाणे इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनासाठीचे अनुदान वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या महिन्याच्या सुरुवातीला अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक दुचाकीवरील अनुदान 10हजार रुपये प्रति किलो वॅटअवर वरून 15 हजार रुपये केले आहे.
त्याच बरोबर अनुदानाची मर्यादा 20 टक्क्यावरून 40 टक्क्यापर्यंत केली आहे. या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना फिक्कीच्या इलेक्ट्रिक वाहन समितीच्या अध्यक्ष सुलज्जा फिरोडिया मोटवानी यांनी सांगितले की, सरकारने दुचाकीसाठी ज्या उपाययोजना केल्या आहेत त्या स्वागतार्ह आहेत. याबाबत फिक्कीने आग्रहाची शिफारस केली होती.
कायनेटीक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्स या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मोटवानी यांनी सांगितले की, सरकारने केलेल्या या उपाययोजनांमुळे पेट्रोल वरील वाहन आणि इलेक्ट्रिक वाहनाच्या किमतीतील तफावत कमी होणार आहे. सरकार तीन चाकी आणि इलेक्ट्रिक बसच्या खरेदीला मदत करणार आहे ही बाबही स्वागतार्ह आहे.
इलेक्ट्रिक दुचाकीसाठी ज्या सवलती जाहीर केल्या आहेत त्या सवलती जर तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनासाठी जाहीर केल्या तर त्यामुळे तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला मदत होईल. त्याचबरोबर स्वयंरोजगार निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार आगामी काळामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि विक्रीला चांगला देणार आहे. आगामी काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने दीर्घ पल्ल्याच्या उपाययोजना केल्या आहेत.