काबूल – गेल्या महिन्यात तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर देश सोडून पळून गेलेल्या माजी अफगाण अधिकाऱ्यांनी अफगाण सरकार विजनवासातच सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. विजनवासातील या सरकारचे नेतृत्व अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह हे करणार आहेत.
स्वीत्झर्लंडमधील अफगाणिस्तानच्या दूतावासाने याबाबातची घोषणा केली आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान हेच केवळ अफगाणचे वैध सरकार आहे. कारण हे सरकार लोकांकडून निवडून आलेले आहे. याखेरीस अन्य कोणतेही सरकार कायदेशीर वैध नाही, असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
सरकारमधील ज्येष्ठ नेत्याबरोबर सल्लामसलत केल्यानंतर हे सरकार निर्वासित म्हणून कार्यरत राहणार असल्याचे ठरल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
अध्यक्ष अशर्रफ घनी हे परागंदा झाल्यामुळे उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह हे या सरकारचे नेतृत्व करतील. या सरकारची कायदेमंडळ, प्रशासकीय आणि न्यायमंडळ ही तिन्ही मंडळे लवकरच सक्रिय होतील, असेही या निवेदनात म्हटले आहे.