श्रीगोंदा – जमीन एकाची, विकणारा दुसरा अन् घेणारा तिसराच, असा प्रकार श्रीगोंद्यात घडला आहे. येथील 25 गुंठे जमिनीची मालकाशिवाय परस्पर खरेदी-विक्री झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मीरा श्रीकृष्ण श्रीपत (रा. तोफखाना, नगर) यांच्या फिर्यादीवरून किरण बबन चौधरी (रा. घारगाव, ता.श्रीगोंदा), गणेश बाबासाहेब काळे (रा. तेलीगल्ली श्रीगोंदा), रंगा देवजी साळवे (रा. चेंबूर मुंबई), मारुती शंकर शिंदे (रा. येवती, ता. श्रीगोंदा) व एका अनोळखी महिला (रा. काळेगल्ली, बुरुडगाव रोड, नगर) या पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मीरा श्रीपत यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, श्रीगोंदा शहरात पालिका हद्दीत गट क्रमांक 2375 मध्ये माझी 25 गुंठे जमीन आहे.
मी खरेदी देण्यासाठी उपस्थित नसताना माझ्या जागी बनावट महिला आरोपींनी खरेदीसाठी उभी केली. 27 मे 2019 रोजी हा बेकायदा व्यवहार करण्यात आला. जमिनीचा फेर क्रमांक 23909 ने सात-बारा दप्तरी बेकायदेशीर नोंद करण्यात आली. माझे नाव वापरून किरण बबन चौधरी (रा. घारगाव) यांनी ही जमीन खरेदी केली. त्यात काळे, साळवे व शिंदे यांची ओळख दाखविण्यात आली आहे.
श्रीपत यांच्या फिर्यादीवरून पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचे पती श्रीगोंदा येथे पाटबंधारे विभागात पूर्वी नोकरीस होते. त्यावेळी त्यांनी श्रीगोंदा येथे गट क्रमांक 2375 मध्ये जमीन घेतली होती. त्या मधील काही जमीन त्यांनी यापूर्वी विकली आहे. मात्र त्याच गटात त्यांची 25 गुंठे जमीन शिल्लक होती.
आढळगाव प्रकरणाची पुनरावृत्ती
जमीन मालकाऐवजी बनावट महिला उभी करून खरेदी-विक्री करण्याची घटना यापूर्वी आढळगाव येथे घडली होती. मूळ मालक विमल बिटके यांच्या ऐवजी बनावट महिला उभी करून जमिनीचा दस्त केला गेला होता. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार संशयाच्या भोरऱ्यात अडकले आहेत.
आरोपींची संख्या वाढणार ?
बेकायदा जमीन खरेदी-विक्री प्रकरणाचा गुंता आणखी वाढणार आहे. मूळ मालकाच्या ऐवजी अनोळखी महिला उभी करण्यात आली. त्या महिलेचे बोगस ओळखपत्र, आधारकार्ड कोणी बनविले? या प्रकरणात आणखी कोणाचे हात आहेत का? याचा पोलिसांनी कसून तपास केल्यास आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.