लॉकडाऊनमुळे शेतमाल विक्री बंद

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली ः पूर्व हवेली भागातील स्थिती

लोणी काळभोर (वार्ताहर) – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे बळीराजा पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाला असून, शेतात पिकवलेला शेतमाल विक्री करता येत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खूपच ढासळली आहे.

पुणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने 13 ते 23 जुलैपर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू केलेली आहे. यामध्ये दवाखाने, मेडिकल व दूध विक्री वगळून बाकी सर्व बंद ठेवण्यात आले आहे. फळे, भाजीपाला मार्केट बंद ठेवण्यात आली आहेत. रस्त्यावरील शेतमालाची विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, यामध्ये बळीराजा पूर्णपणे भरडला जात आहे. भाजीपाला शेतात सडून जात आहे.

शेतकऱ्यांनी शासनाच्या शंभर टक्के अनुदानावर मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने पेरूची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. त्यातच हवेली तालुक्‍यातील फुरसुंगी, गायकवाडवाडी, वडकी, थेऊर, लोणी काळभोरपासून उरुळी कांचनपर्यंत मोठ्या प्रमाणात पेरूची लागवड करण्यात आली आहे. साधारणपणे पेरूची आंतरमशागत म्हणजे खांदणी, रान ओढणे, झाडांना शेणखत घालणे, इत्यादी कामे उरकून जानेवारी महिन्यात पेरूला पाणी सोडले जाते. नंतर प्रत्येक आठवड्यात औषध फवारणी केली जाते. वेळोवेळी बागेतील तण काढले जाते. या गोष्टी मोठ्या खर्चिक आहेत. उत्पन्न तर नाहीच; परंतु खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. यामुळे पेरू उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तरी शासनाने याची पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

पेरूला लागली गळती
पेरूला फळधारणा होऊन माल तोडणी योग्य होण्यासाठी जून महिना उजाडतो. जून, जुलै महिन्यात पेरूचे उत्पादन जोरदार सुरू होते आणि त्याचप्रमाणे आताही उत्पादन सुरू आहे; परंतु संपूर्ण लॉकडाऊनमुळे पेरूची फळे पिकल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच गळून पडत आहेत. झालेली गळ शेतकरी रोज किडीचे प्रमाण वाढू नये, यासाठी बागेतून उचलून लांब टाकत आहेत. हे पेरूचे उत्पादन वर्षातून एकदाच होत असल्याने शेतकरी हताशपणे पाहण्याशिवाय काहीही करू शकत नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.