मुंबई – जागतिक पातळीवर वाढलेली महागाई, डॉलरचा वाढत असलेला भाव आणि रशिया- युक्रेन युद्धामुळे भारतीय रुपयाचे मूल्य गेल्या दोन महिन्यात वेगाने कमी झाले आहे. हे मूल्य एका विशिष्ट पातळीवर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बॅंक प्रयत्न करीत आहे.
यासाठी रिझर्व्ह बॅंकेने मार्च महिन्यामध्ये 20 अब्ज डॉलरची विक्री केली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. या संदर्भात रिझर्व्ह बॅंकेच्या मे 2022 या महिन्यातील अहवालात माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार रिझर्व बॅंकेने मार्च महिन्यात स्पॉट मार्केटमध्ये 20 अब्ज डॉलरची विक्री केली.
मार्च महिन्यामध्ये रिझर्व बॅंकेने स्पॉट मार्केटमधून चार अब्ज डॉलरची खरेदी केली तर 24 अब्ज डॉलरची विक्री केली. त्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यामध्ये रिझर्व बॅंकेने स्पॉट मार्केटमध्ये केवळ 771 दशलक्ष डॉलरची खरेदी केली होती तर पाच अब्ज डॉलरची विक्री केली होती.
रुपयाचे मूल्य स्थिर करण्यासाठी रिझर्व बॅंकेचा परकीय चलन विभाग वेळोवेळी हस्तक्षेप करीत असतो. काही महिन्यांपूर्वी भारताकडे 641 डॉलरचा परकीय चलन साठा होता. मात्र रुपयाचे मूल्य घसरल्यामुळे आणि आयातीसाठी डॉलर मोजावे लागत असल्यामुळे आता भारताकडील परकीय चलन साठ्याची रक्कम 595 अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे.
त्यामुळे आगामी काळात भारताला निर्यात वाढविण्यासाठी आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागत आहेत. मात्र भारताच्या रुपयाचे मूल्य घसरत असल्यामुळे परकीय गुंतवणूकदारांना भारतामध्ये केलेली गुंतवणूक परवडत नाही. त्यामुळे शेअर बाजार आणि रोखे बाजारात झालेली परकीय गुंतवणूक परत जात आहे.
हे गुंतवणूकदार अमेरिकेच्या जास्त व्याज मिळणाऱ्या कर्ज रोख्याची खरेदी करीत असल्याचे वातावरण सध्या आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे भारताची परिस्थिती अधिकच बिघडली आहे. परंतु युद्ध संपण्याची कसलीही लक्षणे नजीकच्या भविष्यात दिसत नाहीत.