भेसळयुक्‍त बर्फीची विक्री

81 हजार 750 किमतीची 545 किलो बर्फी जप्त

पुणे – दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर भेसळयुक्‍त मिठाईचे उत्पादन होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मिठाईंच्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे.

भेसळयुक्‍त बर्फीची विक्री केल्याप्रकरणी इंदापूर तालुक्‍यातील निमगाव केतकी येथील शुभम मिल्क प्रॉडक्‍टवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. या छाप्यामध्ये 81 हजार 750 किमतीची 545 किलो बर्फी जप्त करून नष्ट करण्यात आली.
निमगाव केतकी येथील शुभम मिल्क प्रॉडक्‍टमध्ये भेसळयुक्‍त बर्फीचे उत्पादन करून 10 किलोच्या पिशव्यांमधून विक्री करत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता दूध किंवा खव्यापासून बर्फी तयार न करता सूर्यफूल तेल, हायड्रोजिनेटेड व्हेजिटेबल फॅट व स्किम्ड मिल्क पावडरमध्ये साखर टाकून भेसळयुक्‍त बर्फी तयार केल्याचे आढळले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

या दुकानदारास यापुढे बर्फीचे उत्पादन बंद करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई प्रशासनाचे प्रभारी सहआयुक्‍त संपतराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्‍त अर्जुन भुजबळ व अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी अंकुश यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.