मुंबई – गर्भपाताकरिता वापरात येणाऱ्या औषधाची ऑनलाइन विक्री होत असल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने ऍमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस बजाविली आहे. प्रशासनाने एकूण 34 ऑनलाइन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेबाबत पडताळणी केली. यानंतर ही कारवाई करण्यात आली.
ऍमेझॉन या संकेतस्थळावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून मागणी नोंदविली. त्यानुसार डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या औषधाची मागणी ऍमेझॉनवर स्वीकारून दोन वेळा ऑनलाइन विक्री करण्यात आली. हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 मधील तरतुदींचे उल्लंघन आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात फ्लिपकार्ट या ऑनलाइन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांची मागणी नोंदविली असता, डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनची मागणी न करता फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर दोन वेळा औषधाची मागणी स्वीकारण्यात आली व ते पुरविण्यात येणार असल्याचेदेखील संकेतस्थळावरून एसएमएस संदेशद्वारे कळविण्यात आले.
तसेच ऍमेझॉन या संकेतस्थळावरून MTP Kit ची विक्री पुण्यातील औषध विक्रेत्यास केल्याने औषध विक्रेत्याने पुणे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास तक्रार दाखल केली होती. या तक्रारी अनुषंगाने प्रशासनाने तातडीने कारवाई करून यामध्ये सामील असलेला पुरवठादार, मे. आर. के. मेडिकल, अहमदाबाद, गुजरात यांचेकडे प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली. या वितरकाकडे औषधाचे खरेदी बिल नसल्याचे उडकीस आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून संबंधिताविरुद्ध पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.