पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने जमा केले आहेत. त्यामुळे वर्षभरापासून वेतनाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या प्राध्यापकांना दिलासा मिळाला आहे. तसेच उर्वरित महाविद्यालयांमधील तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनासाठी दि.3 ते 5 मार्च या कालावधीत शिबिर आयोजित केले आहे.
या प्राध्यापकांचे मानधन ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ऑनलाइन वेतन देण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावर उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने शासनाकडून ऑफलाइन वेतन देण्याबाबत परवानगी मागितली होती. शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांचे वेतन देण्यात आले.
पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मोहन खताळ म्हणाले, विभागातील 44 महाविद्यालयांचे तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या वेतनाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तसेच संबंधित प्राध्यापकांच्या खात्यावर वेतनाची रक्कम जमा केली आहे. तसेच उर्वरित महाविद्यालयांचे प्रस्ताव येत्या 3 ते 5 मार्च या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत.