पालिका प्रशासनाचा कारभार : दोषींवर कारवाईचे आदेश
पुणे – महापालिकेच्या शाळांमधून दोन महिन्यांपूर्वी निवृत्त झाल्यानंतरही 19 शिक्षकांना दोन महिने वेतन सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. नगरसेवक महेंद्र पठारे यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. यावर या कारभाराला जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष रासने यांनी प्रशासनाला दिले.
महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील 19 शिक्षक दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. यामध्ये मुख्याध्यापकाचाही समावेश आहे. एरव्ही अगदी सफाई कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्यावेळीही सर्व तपासण्या करून त्यांचे वेतन दिले जाते. यासाठी कधी कधी तीन-चार महिने विलंबही होतो. मात्र, शिक्षण विभागाकडील परिस्थिती वेगळीच असल्याचा मुद्दा उपस्थित करत नगरसेवक पठारे यांनी सेवानिवृत्त शिक्षकांना अद्यापही वेतन दिले जात असल्याची धक्कादायक बाब स्थायी समितीच्या बैठकीत उघड केली.
यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी 19 शिक्षकांबाबत हा प्रकार झाल्याचे मान्य केले. संबधित शिक्षकांना दोन महिन्यांच्या वेतनाची जमा रक्कम तातडीने प्रशासनाकडे जमा करण्याविषयीची नोटीसही पाठवली असून, काही शिक्षकांनी ती परत केल्याचे स्पष्टीकरण बैठकीत देण्यात आले.
अभ्यासिकांना निकषांत परवानगी द्या : महापौर
शहरात 100 पेक्षा जास्त अभ्यासिका आहेत. येथे राज्य, जिल्ह्यांतून शिक्षण तसेच विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी शहरात येतात. त्यामुळे आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शहरातील अभ्यासिकांना करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परवानगी देण्यात यावी, अशी सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांकडे केली आहे. यावर लवकरच निर्णय होणार असून नियमांची अंमलबजावणी करून अभ्यासिका पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये एमपीएससी, यूपीएससी आदी स्पर्धा परीक्षा होणार आहेत. त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे.