आपला आहार चौरस असावा असे आपण अनेकदा ऐकतो. आता चौरस म्हणजे काय? तर ज्या आहारातून जीवनसत्त्व, लोह, खनिज, प्रथिने, क्षार, फायबर इत्यादी पोषक घटक शरीराला मिळतील तो आहार. यामध्ये धान्ये, कडधान्ये, पालेभाज्या, फळे, दूध यांबरोबरच सलाडचाही समावेश होतो.सलाड रोजच्या आहारात अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक घटक तर मिळतातच, पण शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासही त्याची चांगली मत होते.
हे सलाड आपण कच्चे खाऊ शकतो त्याबरोबरच कोशिंबीर करूनही खाऊ शकतो. दररोज सलाड खाल्ल्यास मूळव्याध, बद्धकोष्ठता, आतड्यांचे विविध आजार असे पचनाशी निगडित समस्यांवर आळा घालणे शक्य आहे. पाहूयात बीट, काकडी, टोमॅटो, गाजर, मूळा यांसारख्या सलाडचा आहारात समावेश असण्याचे काही फायदे…
- सलाड हे तंतूमय पदार्थांमध्ये येते, यामुळे शरीराची पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते.
- सलाड आपण शक्यतो कच्चे खात असल्याने शरीराला आवश्यक असणारी अनेक जीवनसत्त्वे त्यातून जास्त प्रमाणात मिळण्यास मदत होते.
- कोशिंबीर करताना आपण त्यात दही घालतो किंवा लिंबू पिळतो त्यामुळे शरीराला क’ जीवनसत्त्व मिळते.
- मधुमेह, रक्तदाब, मूळव्याध, थायरॉईड यांसारख्या समस्या असणाऱ्यांनी तर आहारात आवर्जून सलाडचा समावेश करावा.
- बाहेर जेवायला गेलो तरी हॉटेलमध्ये इटालियन, मॅक्सिकन अशाप्रकारची सलाड मिळतात. त्यामुळे तेलकट किंवा मैद्याचे पदार्थ खाण्यापेक्षा या पर्यायाचा आपण नक्कीच विचार करू शकतो.
- सलाडचा सूपमध्येही वापर करता येऊ शकतो. लहान मुलांना सूपमध्ये वेगवेगळे सलाड घालून दिल्यास ते सहज पोटात जातात.
- तसेच मुळा, कोबी, गाजर यांचे पराठे केल्यास या भाज्या पोटात जाण्यास मदत होते. या भाज्यांचे कटलेट केल्यास मुले अगदी आवडीने ते खातात.
- सलाड कधीही जास्त वेळ कापून ठेऊ नये. खायच्या वेळेला कापून घ्यावे, जास्त वेळ कापून ठेवल्यास सलाडमधील पोषक घटक नष्ट होतात. अनेकांना डब्यातही सलाड कापून नेण्याची सवय असते. मात्र, तसे न करता ऑफिसमध्ये जेवणाच्या वेळी सलाड कापून घ्यावे.
- रक्तातील साखर कमी होण्यास तसेच त्वचेची कांती सुधारण्यास सलाडमुळे मदत होते. सलाडमुळे दृष्टी सुधारण्यासही मदत होते.