ठोसेघर, (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसापासून ठोसेघर, कास परिसरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. पावसाच्या सरीवर सरी कोसळत असून ओढे, नाले दुधडी भरून वाहत आहेत. जोरदार पावसामुळे बुधवारी रात्री सज्जनगड घाटात दरड रस्त्याच्या मधोमध येऊन कोसळली. यामुळे वाहतूक काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी रात्री सज्जनगड घाटातील धोकादायक दरडचा काही भाग रस्त्याच्या मधोमध येऊन कोसळला होता. त्यामुळे साताऱ्याकडून सज्जनगड व ठोसेघर परिसरातील छोटा मोठा खेडेगावांकडे जाणारी वाहतूक काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या माध्यमातून दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. काही काळातच या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. मुसळधार पावसादरम्यान सज्जनगड घाटात वारंवार दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असतात.
त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घाट मार्गातून प्रवास करताना एखादा अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपली वाहने काळजीपूर्वक चालण्याचे आवाहन परिसरातील स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.