दिवाळीनिमित्त सजली नगरची बाजारपेठ 

ग्राहकांमधील खरेदीचा उत्साह मावळला जेमतेम प्रतिसाद
नगर  –
दिवाळीच्या सणाचा एक वेगळाच बाज असतो. प्रत्येक जण हा सण आपापल्यापरीने साजरा असतात. उटणे, पणती, आकाशकंदील, सुगंधी फुले अक्षरशः वातावरण प्रसन्न होऊन जात असते. या वातावरणामध्ये सुंदर नक्षीदार, रंगबिरंगी आकाश कंदील त्यामध्ये विद्युत दिवे यांच्या रोषणाईने संपूर्ण परिसरात झगमगाट असतो.

सध्या बाजारात अश्‍याच वेगवेगळ्या आकाराचे आकाशकंदील उपलब्ध झाले आहेत. या वर्षीची दिवाळी साजरी होण्यासाठी बाजारात लक्षवेधी कागदी आणि कापडी आकाश दिवे पहावयास मिळत आहेत. याशिवाय गोरोसन पेपर, युको फ्रेंडली, मल्टीपेपर, लाकडी आकाशदिवे देखील उपलब्ध आहेत. आकाशदिव्याची किंमत 100 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत आहे. यामध्ये अधिक मागणी युको फ्रेंडली आणि लाकडी आकाशदिव्यांना आहे.

सध्या बाजारात रांगोळीमध्येही वेगवेगळे ट्रेन्ड पाहायला मिळतात. आधी पांढऱ्या रांगोळीने नक्षी काढली जायची. त्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे रंग भरण्याचा ट्रेन्ड आला. या शिवाय बाजारात रांगोळ्यांचे स्टिकर्स आणि रेडिमेड रांगोळ्याही मिळतात. यंदा पांढरी रांगोळी दहा रुपये किलो, तर रंगीत रांगोळी 40 रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. तसेच विविध प्रकारच्या रंगांमध्ये रांगोळी असल्याने त्यातील गुलाबी, लाल, पोपटी, भगव्या, हिरव्या रंगाच्या रांगोळीला अधिक मागणी आहे. रांगोळी काढण्यासाठीचे साचे उपलब्ध आहेत. यात प्लॅस्टिकची पणती, शुभ लाभ, शुभ लक्ष्मी आदींसह विविध नावांचे प्लॅस्टिकचे साचे बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

त्यात रांगोळी भरून ते साचे जमीन, फरशीवर उठवल्यास त्यातील अक्षरे, नक्षीनुसार रांगोळी रेखाटली जाते. याशिवाय, या वर्षी बाजारपेठांत पूजेचे साहित्य, खास मुलांसाठी तयार किल्ले, शिवाजी महाराज, मावळे, शेतकरी, प्राणी यांच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. लक्ष्मीपूजनाचे विविध प्रकारचे साहित्यही उपलब्ध आहे. सजावटीच्या साहित्याच्या दरामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव वाढले. याला कारण, जीएसटी आहे. जीएसटी मुळे वस्तूंच्या किमती जास्त झाल्याने ग्राहक खरेदी करतांना हात आखडता घेत आहेत. सर्वसाधारण प्रतिसाद मिळत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.