कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा ससाणेंनी दिला राजीनामा

22 दिवसांत ससाणेंनी सोडले पद : लोकसभेत निवडणुकीत राहणार तटस्थ

नगर – कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी उद्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असतांनाच कॉंग्रेसचे नवनिवार्चित जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी पदाचा राजीनामा दिला. कॉंग्रेस पक्ष सोडणार नाही पण लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ससाणेंच्या या निर्णयामुळे कॉंग्रेसला चांगलाच झटका बसला असून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना मात्र हा धक्‍का मानला जात आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे ससाणे यांनी राजीनामा पाठविला असल्याचे सांगण्यात आले आहे. ससाणे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तसेच पक्ष सोडणार नाही. पण पक्षाच्या उमेदवारांचे काम देखील करणार नाही. असे सांगून या लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याची भूमिका यांनी मांडली. ते म्हणाले, आ. भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांचा प्रचार करीत होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून आ. कांबळे यांनी माझे वडील कै. जयंत ससाणे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्‍तव्य केल्याने कार्यकर्ते तर नाराज झाले आहे. पण मी देखील या उमेदवाराचे काम कसे करावे असा प्रश्‍न पडला. मी जर पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार नसेल तर जिल्हाध्यक्षपदावर देखील राहण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असे ससाणे म्हणाले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी प्रचारादरम्यान साईबाबांच्या झोळीत हात घालणाऱ्याचे कधीच चांगले झाले नाही, असे वक्‍तव्य केले होते. यामुळे ससाणे समर्थक नाराज होते. अर्थात ससाणे व आ. कांबळे यांचे श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीपासून संषर्घ सुरू झाला होता. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष कै. जयंत ससाणे यांना आ. कांबळे समर्थकांनी वेळोवेळी अडचणीत आणल्याने ससाणे समर्थक आ. कांबळे यांचे काम करण्यास तयार नव्हते. तरी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद मिळाल्याने आपली जबाबदारी वाढली असून काही असले तरी कॉंग्रेसची ही जागा निवडून आणली पाहिजे. अशी भूमिका करण ससाणे यांनी मांडली होती.

सुरवातीला ससाणे यांच्यासह समर्थक आ. कांबळेंच्या प्रचारात सक्रिय नव्हते. परंतु गेल्या सोमवारपासून पक्ष म्हणून त्यांनी काम सुरू केले होते. बुधवारी कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेला करण ससाणे उपस्थित होते. या सभेत ससाणे यांनी आ. कांबळे यांना निवडून आणण्याचे आवाहन देखील केली होते. परंतु त्याच दरम्यान ससाणे समर्थकांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थित बैठक झाली. त्या बैठकीला करण ससाणे उपस्थित नव्हते. पण त्यांच्या माताश्री राजश्री ससाणे मात्र उपस्थित होत्या. या बैठकीत कॉंग्रेसचे उमेदवार आ. कांबळे यांचे काम न करण्याचा निर्णय झाला होता. यावेळी ना. विखे यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले की, माझी भूमिका नाही तर करण ससाणे यांची भूमिका महत्त्वाची आहे. ते काय ते भूमिका जाहीर करतील. असे सूचक वक्‍तव्य ना. विखे यांनी बुधवारी केले होते. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये गडबड होणार असल्याचे कालच स्पष्ट झाले होते.

त्याप्रमाणे आज करण ससाणे यांनी राजीनामा दिला. ससाणे यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आ. थोरात यांचा मोठा वाटा होता. ना. विखेंची कोंडी करण्यासाठी आ. थोरात यांनी आ. कांबळे यांना लोकसभेची उमेदवारी दिली तर ससाणे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्‍त केली होती. परंतु कांबळे व ससाणे यांचे सख्ये पाहता ससाणे हे कांबळेंचे काम करणार नाही हे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विखे गट शिर्डी लोकसभा मतदारसंघात सक्रिय झाला असून त्यांनी पहिला दणका ससाणे यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या रूपाने आ. थोरातांना दिला असल्याचे मानले जात आहे. यापूर्वीचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब शेलार हे ना. विखेंचे समर्थक होते. ते भाजपच्या व्यासपीठा गेल्याने आ. थोरातांनी ही संधी साधून ससाणे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली होती. परंतु ससाणे हे ना. विखेंचे समर्थक त्यात आ. कांबळे यांच्याबरोबर असलेला संषर्घ या विचार करता 22 दिवसांत ससाणे यांनी जिल्हाध्यक्षपद सोडले. सध्या कॉंग्रेस खिळखिळी करण्यात ना. विखे यशस्वी झाले असून आता आ. थोरात कोणती चाल खेळतात याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.