तरुणीचे वडील, भावांसह चौघे पोलिसांच्या ताब्यात
पुणे – प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून वडील आणि भावांनी तरुणीच्या प्रियकरावर प्राणघातक हल्ला केला. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास धानोरी येथे ही घटना घडली. यामध्ये राजू गौतम भिसे (वय 25) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले आहे.
जखमी तरुणाची आई सुनीता भिसे यांनी विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशीष मोरे, जीवन परियार, प्रतीक ओव्हाळ आणि सुनील ओव्हाळ या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जखमी राजू याचे प्रतीकच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध आहेत. याच कारणावरून हा वाद झाला. “माझ्या बहिणीचा नाद सोडून दे’ असे सांगत प्रतीक आणि त्याच्या वडिलांनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने राजू भिसे याला रॉडने मारहाण केली. त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले.
राजूला वाचविण्यासाठी गेलेल्या आईलाही आरोपींनी मारहाण केली. यामध्ये राजू भिसे हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी धाव घेत चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे.