अहमदनगर – मंत्रालयात नोकरीला लावतो असे सांगून तरुणांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. याप्रकरणी तिघांना अटक देखील करण्यात आली आहे. दत्तात्रय क्षीरसागर (रा. नाशिक), आकाश शिंदे, ओमकार तरडे (दोघेही रा. संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान या प्रकरणा सैराट चित्रपटात प्रिन्सची भूमिका बजावणारा सुरज पवार याचाही सहभाग असल्याचे समोर आले असून त्याला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी संशयितांकडून पाच लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
अटक संशयीतांची कसून चौकशी केली असता या फसवणूक रॅकेटमध्ये सुरज पवार याचेही नाव समोर आले आहे. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. महेश वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.