बेंगळुरू – कर्नाटकातील बेळगावी येथे एका महाराजांचा कार्यक्रमादरम्यान प्रवचन देताना हृदयविकाराचा झटका येऊन मंचावरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगणा बसव स्वामी (वय, 53) असे मृत्यू पावलेल्या महाराजांचे नाव आहे. ही घटना 6 नोव्हेंबरची आहे, मात्र आता त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बसगावी येथे संगणा बसव स्वामी आपल्या अनुयायांना प्रवचन देताना अचानक बेशुद्ध झाले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र हृदयविकारा तीव्र धक्क्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
बसव स्वामी हे बालोबाला मठाचे आणि बसवयोग मंडप ट्रस्टचे प्रमुख होते. 6 नोव्हेंबर रोजी त्यांचा वाढदिवस होता आणि ते त्यांच्या मठात अनुयायांना संबोधित करत होते. प्रवचनादरम्यान ते अचानक कोसळले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. वाढदिवसाच्या दिवशीच घडलेल्या दुर्देवी घटनेने अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या साक्री तालुक्यातील जामदे गावात कीर्तनकार ह.भ.प.ताजुद्दीन महाराज शेख यांना कीर्तन करताना अचानक छातीत कळ येऊन ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यात त्यांचे निधन झाले. त्यानंतर ताजुद्दीन महाराज यांना त्यांचे मूळ गाव जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथील बेदलापुरी आश्रमात हिंदू धर्मानुसार समाधी देण्यात आली.