अभिवादन: संत चोखामेळा

हरिप्रसाद सवणे

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्‍वर आणि संत नामदेवराय या उभय संतांनी भागवत संप्रदायाची या भूमीत मुहूर्तमेढ रोवली. तीर्थक्षेत्र पंढरपूर आणि आळंदी क्षेत्र या परिसरात या संतांनी वारकरी विचारधारेची पायाभरणी केली. ही दोन्ही क्षेत्रे त्यावेळी भागवत संप्रदायाची केंद्रस्थाने बनली होती. याच काळात पंढरपूरपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मंगळवेढा येथे अनेक संत होऊन गेले. म्हणून या मंगळवेढे भूमीला संतांची व पवित्रभूमी असे म्हटले जाते. संत चोखामेळा, संत दामाजीपंत, संत कान्होपात्रा, संत बंका, यांसारखी अनेक वारकरी संतमंडळी या मंगळवेढे भूमीत होऊन गेली. यामधीलच एक संत म्हणजेच संत चोखामेळा होय.

अस्पृश्‍य कुळात जन्म झाल्यामुळे चोखोबारायांना समाजाने हिणवले. परंतु आपल्या विठ्ठल भक्‍तीच्या आणि नामस्मरणाच्या जोरावर ते भगवंताच्या जवळ पोहोचले. भागवत धर्माची विचारधारा ही जातीभेदरहित असल्याचे चोखोबारायांनी सिद्ध केले. सामान्य कुळात जन्म झालेल्या साधकाला देखील नामस्मरण करण्याचा अधिकार असून तो भक्‍त भगवंताला प्राप्त करू शकतो हे त्यांनी जगाला दाखवून देऊन तत्कालीन समाजव्यवस्थेला छेद दिला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या संत वचनानुसार जातिभेदरहित असणारी संतचळवळ चोखामेळा यांनी अधिक दृढ केली. म्हणून चोखोबारायांना संतपरंपरेत अग्रगण्य स्थान आहे. संत चोखामेळा यांच्या अभंगरचना या विठ्ठलाप्रती अतिशय उत्कट आणि समर्पणात्मक भाव व्यक्‍त करणाऱ्या आहेत. गोड अभंगामधून त्यांनी विठ्ठलावरील प्रेम, भक्‍ती, सोबत अस्पृश्‍य म्हणून सामाज्याने दिलेला त्रास आणि त्यामधून सोडवणूक करण्याचे परमेश्‍वराकडे केलेले निवेदन आदी विषय मांडले आहेत. तसेच संत चोखोबारायांच्या अभंगांचे प्रतिबिंब संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून दिसून येते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होते.

संत चोखोबारायांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील मेहुनपुरी या ठिकाणी झाला. परंतु त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पंढरपुरातील मंगळवेढे या परिसरातच व्यतीत केले. पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारात चोखोबारायांची समाधी असून त्या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले भाविक आवर्जून चोखोबारायांच्या समाधीचे दर्शन घेतात. समकालीन असणाऱ्या संत नामदेवरायांनी चोखोबारायांचे चरित्र आपल्या अभंगामधून लिहिले आहे. संत चोखामेळा यांचा व्यवसाय गवंडी काम करणे हा होता. बांधकाम करता करता अखंड विठ्ठल नामाचा त्यांचा जप चालू असायचा. संपूर्ण कुटुंब काम करता करता विठ्ठल भक्‍तीत न्हाऊन गेलेले असायचे. सोयरा ही चोखामेळा यांची धर्मपत्नी. सोयरा हीदेखील विठ्ठलभक्‍त होती. चोखामेळा यांची वैरागी वृत्ती आणि विठ्ठलभक्‍ती यामुळे प्रभावित होऊन सोयरा यांनाही संतत्व प्राप्त झाले. मुलगा कर्ममेळा यानेही आयुष्य विठ्ठल भक्‍तीत वाहून घेतले. बहीण निर्मळा हिचे देखील अभंग उपलब्ध आहेत. निर्मळाचे पती संत बंका हे देखील मंगळवेढे भूमीतील असून त्यांचेही अभंग आहेत.

मंगळवेढे गावाभोवती गावकूस बांधण्याचे काम चालू होते. यामध्ये चोखामेळा यांचे कुटुंब काम करत होते. चाळीस दिवस काम चालले. सोबत अनेक मजूर होते. परंतु दुर्दैवाने अपघात झाला. गावकुसाची भिंत कोसळली. यामध्ये चोखोबारायांसह संपूर्ण कुटुंब आणि अनेक मजूर दगडमातीखाली गाडले गेले. यातच त्यांची देहयात्रा संपली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.