मुंबई – लॉकडाउननंतर चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्यात आली असली तरी प्रेक्षकांकडून अद्याप प्रतिसाद मिळत नाही. यामुळे अनेक चित्रपट थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येत आहे. आतापर्यत अनेक बिग बजेट चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले आहेत.
आता या यादीत बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकचाही समावेश होणार आहे. बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा स्टारर हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. हा बायोपिक मे-जून 2020मध्ये प्रदर्शित होणार होता; परंतु लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता निर्मात्यांकडून पुन्हा चित्रपटाची रिलीज डेट निश्चित करण्यावर चर्चा सुरू करण्यात आली आहे.
सध्या चित्रपटगृहात फक्त 50 टक्के प्रेक्षकांनाच परवानगी असल्याने निर्मात्यांकडून डिजिटल प्लॅटफॉर्मला प्राधान्य देण्यात येत आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. दरम्यान, या बायोपिकमध्ये सुरुवातीला श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारणार होती; परंतु तिने माघार घेतल्याने परिणितीला संधी देण्यात आली.
सायना नेहवालचा हा बायॉपिक येत्या काही महिन्यात रिलीज करण्यात येऊ शकतो. हा चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली असून परिणितीला पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत.