मुंबई – दाक्षिणात्य अभिनेता प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या, निर्मात ओम राऊतच्या “आदिपुरुष’ चित्रपटातील रावणाच्या भूमिकेचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य अभिनेता सैफ अली खानच्या अंगाशी आल्यानंतर, सैफने बिनशर्त माफीनामा प्रसिद्ध केला आहे. हा चित्रपट आणि निर्मात्यासह सैफ अली खानवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेन्ड सोशल मिडीयात व्हायरल झाल्याने सैफने माफी मागितल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातील राम कदम या नेत्यानेही सैफविरोधात मोहोम उघडल्याने प्रश्न अधिकच गंभीर बनला होता. त्यामुळे आता हिंदूंच्या भावनांशी खेळण्याचे धाडस यापुढे कोणी करणार नाही, असा संदेश या माफीनाम्यातून मिळाला आहे, असे मानले जात आहे.
रावण हा काही क्रूर नव्हता, आणि त्याचे व्यक्तिमत्त्व आम्ही सकारात्मक दाखवणार आहोत. रामायण हे धर्मयुद्ध नव्हते, तर रावणाची बहिण शूर्पणखेच्या अपमानाचा बदला घेणारे सूडनाट्य होते, अशी मुक्ताफळे सैफ अली खानने उधळली होती. त्यानंतर त्याच्या विरोधात ट्रेन्डींग सुरु झाले होते.