Saif Ali Khan Attacker: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराकडून हा हल्ला करण्यात आला होता. या घटनेतील आरोपीला मुंबई पोलिसांनी आज (19 जानेवारी) सकाळी अटक केले. त्यानंतर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शहजाद या आरोपीला वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सुनावली आहे.
पोलिसांनी न्यायालयाकडे 14 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाकडून आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मुंबई पोलिसांनी न्यायालयाला आरोपीने सैफ अली खान हल्ला केला असल्याची माहिती दिली. तसेच, हल्ल्यात वापरलेल्या ब्लेड जप्त करण्यात आले आहे. आरोपीच्या नागरिकत्वाबाबतही चौकशी करायचे असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
आज सकाळी ठाण्यातील कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटच्या मागील परिसरातून मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली. या आरोपीने नाव मोहम्मद शरिफूल इस्लाम शहजाद (30 वर्षे) आणि विजय दास अशी सांगितली. आरोपी ठाण्यातील एका बारमध्ये हाऊसकीपिंग वर्कर म्हणून काम करत होता.
पोलिसांनी प्रेस नोटमध्ये आरोपी हा मुळचा बांगलादेशमधील झलोकाठी जिल्ह्यातील ग्राम राजाबरीया येथील नागरिक असल्याची माहिती दिली आहे. तसेच, त्याने चोरीच्या उद्देशाने गुन्हा केल्याची कबुली देखील दिली आहे.
दरम्यान, 16 तारखेला पहाटे 3 वाजता सैफवर राहत्या घरात चाकूहल्ला झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे त्याच्यावर डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर आता सैफच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.