सह्याद्रीच्या “मिशन प्रेरणा’ उपक्रमाला सहकार्य करावे

उदयनराजे भोसले; लहान मुलांच्या दुर्धर आजारावर मोफत उपचाराची योजना

सातारा – पुण्याच्या सह्याद्री सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलने “मिशन प्रेरणा’व्दारे लहान मुलांच्या दुर्धर आजारावर मोफत उपचार करण्याचे ठरवलेले उद्दिष्ट सध्याच्या काळात सर्वसामान्यांसाठी अत्यंत गरजेचे व उपयुक्‍त आहे. या सामाजिक उपक्रमात आम्ही सर्वार्थाने सहकार्य करीत आहोत. इंडियन मेडिकल असोसिएशन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात आपापले उत्तरदायित्व पार पाडावे.

तालुकानिहाय महत्वाच्या ठिकाणी लहान मुलांच्या आजारांचे निदान करणारी शिबिरे आयोजित करावीत. दुर्धर आजाराने ग्रस्त लहान मुले निश्‍चित करून त्यांच्यावर मोफत उपचार करावेत, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. मुुंबई नर्सिग कायद्याअंतर्गंत “आयएमए’च्या सदस्यांनी विविध हॉस्पिटलच्या संदर्भात पाठविलेल्या प्रस्तांवावर जिल्हा शल्य चिकित्सकांनी दोन दिवसांत योग्य ते निर्णय घ्यावेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

सातारच्या शासकीय विश्रामगृहात सह्याद्री हॉस्पिटलचे सरव्यवस्थापक सचिन कुलकर्णी व अन्य समन्वयक पदाधिकारी तसेच इंडियन मेडिकलअसोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, जिल्हा शल्य चिकित्सक आमोद गड्डीकर यांच्या बैठकीत खासदार भोसले बोलत होते. लहान मुलांना दुर्धर आजार असल्यास त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो.

मुलाच्या आजारावरील उपचारासाठी लाखो रुपये यकर्च होतात, त्यामुळे सह्याद्री हॉस्पिटल्सने मिशन प्रेरणांतर्गंत लहान मुलांच्या दुर्धर आजारावर मोफत उपचार करण्याचा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यासाठी पुढाकार घेतला आह, असे सांगून खासदार भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व बालरोग तज्ज्ञांनी अशा प्रकरणांची माहिती सह्याद्री हॉस्पिटलकडे प्रस्तावित करावी, या उपक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनीही आपल्या यंत्रणेव्दारे योगदान द्यावे, असे आवाहन केले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सातारा शाखेच्या सदस्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे हॉस्पिटल्सच्या संदर्भात फेब्रुवारीपासून दिलेल्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतलेला नाही, ही बाब भोसले यांच्या निदर्शनास आणून देताच याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांनी मुंबई नर्सिंग कायद्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करुन प्रकरणे सकारात्मक दृष्टीकोनातून दोन दिवसांत निकाली काढावीत, अशी सूचना केली.

या संयुक्‍त बैठकीत सह्याद्री हॉस्पिटल्सचे सचिन कुलकर्णी, विनय पंचवाघ, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, हेमंत बापट, सागर शिंद, यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जीवन लाहोटी, सचिव सुर्यकुमार खंदारे, “अहो’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप आठवले, सचिव डॉ. गिरिश पेंढारकर, डॉ. विकास पाटील, डॉ. अशोक गोंधळेकर, डॉ. अच्युत गोडबोले, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. शेटे, डॉ. गोसावी, डॉ. चौधरी आदी प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)