Sahyadri Tiger Reserve – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेल्या तीन वर्षांपासून तीन नर वाघांचा वावर सुरू आहे. त्यांनी आपल्या हद्दी निश्चित केल्या आहेत. सेनापती व सुभेदार हे दोन वाघ प्रामुख्याने चांदोली भागात फिरत आहेत तर कोयना भागात बाजी याने आपले हद्द क्षेत्र निश्चित केले आहे. बाजी वाघाने भैरवगड ते पाली मालदेवपर्यंत आपली हद्द निश्चित केली असून कोयना क्षेत्रात तो फिरत आहे आणि शिकार करीत आहे. कोयना क्षेत्रामधील काही कॅमेरा ट्रॅपमध्ये बाजी या नर वाघाचे फोटो व व्हिडिओ नुकतेच आले आहेत.बाजी वाघाच्या पायाचा पंजा साधारण 16 से. मी. आहे. हा पूर्ण वाढलेला जवळपास 3 ते 3.5 वर्षाचा मोठा नर वाघ आहे. नुकतेच राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी फेज 1 चे अखिल भारतीय व्याघ्र गणनाचे आयोजन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात केले होते. १२ ते १७ जानेवारी असे फेज १ चे सर्वेक्षण होते. सर्व भारतातून वेगवेगळ्या राज्यातून जवळपास ७५ स्वंयसेवक ह्या सर्वेक्षणसाठी आले होते. केरळ, कर्नाटक, ओडिशा,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,बिहार तसेच महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून स्वयंसेवक आले होते. सर्वेक्षण दरम्यान विविध ठिकाणी कॅमेरामधील विविध प्राण्यांची हालचाली यांची ही नोंद घेण्यात आल्या. सह्याद्रीमध्ये नुकतेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघीण यांना सह्याद्रीमध्ये सोडण्यात आले आहे. भविष्यात मादी वाघ आल्यामुळे सह्याद्रीमध्ये वंशवृद्धी होऊन सह्याद्रीमधील वन पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढ होईल व त्यामुळे नवनवीन वन पर्यटन रोजगाराच्या संधी उघडतील, असा विश्वास वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केला आहे.