प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 – महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर अशी अनेक बिरुदे अभिमानाने मिरवणाऱ्या पुणे शहराचा ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्सर्वांचा मागोवा घेणारी नवी मालिका “आपलं पुणं’ दि.28 ऑगस्ट 2022 पासून दर रविवारी सायंकाळी 6:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सुरू होणार आहे, अशी माहिती आकाशवाणी आणि दूरदर्शन पुणे यांचे कार्यक्रम प्रमुख इंद्रजित बागल यांनी दिली.
सुमारे 50 हजार वर्षांपूर्वीच्या मानवी वस्तीच्या खुणा पुण्यामध्ये यापूर्वीच आढळल्या आहेत. तत्कालीन पुण्यापासून ते आज आयटीचे हब असलेले पुणे. मेट्रोचा प्रवासापर्यंत पुण्याची झालेली वाटचाल आणि त्या सोबतच शहरातील महत्त्वाच्या वास्तू, व्यक्ती, पुण्यावर आलेली संकटे, पुणेकरांनी त्यावर केलेली मात, इथे घडलेले महत्वाचे प्रसंग यात दाखवले जाणार आहेत. शिवाय डेक्कन कॉलेज, कसबा गणपती मंदिर, शनिवारवाडा, पर्वती, नानावाडा, पाताळेश्वर लेणी, आगाखान पॅलेस आदी वास्तूंचा समावेश असेल. पुण्याला घडविण्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचाही यामध्ये परिचय असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, नानासाहेब पेशवे, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका, जमशेदजी जीजीभॉय, डॉ. हसमुखलाल सांकलिया, डेव्हिड ससून इत्यादी व्यक्तींच्या कार्याची माहिती दिली जाणार आहे.
कधी उद्ध्वस्त भकास झालेले पुणे शहर कात टाकून पुन्हा कसे वसले, आदिबाबत रोचक माहितीही आपल्या या मालिकेतून जाणून घेता येईल. मालिके लेखन युवा संशोधक आश्विन चितळे यांनी केले आहे. सोबतच डॉ. मंजिरी भालेराव, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. श्रीकांत गणबीर, पांडुरंग बलकवडे, डॉ. उदय कुलकर्णी डॉ. अविनाश सोवनी, डॉ. श्रीनंद बापट आदींचा मालिकेमध्ये सहभाग असणार आहे.