निष्क्रियांना चटका देण्यासाठी वाटले सागरगोटे

जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलनकर्त्यांना अटक

नगर – 31 मार्चला आर्थिक वर्ष संपत असताना सत्ताधारी भाजपच्या 5 वर्षांच्या कार्यकाळाची समाप्ती होत असल्याने मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने सत्ताधाऱ्यांचा 5 वर्षांच्या कार्यकाळाचा लाभांश नागरिकांना कवड्या-रेवड्यांच्या स्वरूपात वाटण्यात आले. तर जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी अटक केली.

सत्ताधाऱ्यांनी घरकुल वंचितांना घरे देण्यासह अनेक योजनांची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना 5 वर्षांत काहीच मिळालेले नसल्याचे निषेध व्यक्त करण्यात आला. हुतात्मा स्मारक येथे आंदोलनाप्रसंगी पंगतीने बसलेल्या घरकुल वंचितांच्या ताटात कवड्या-रेवड्या टाकून निष्क्रीय मंत्री पोसणार्या सत्ताधाऱ्यांना चटका देण्यासाठी सागरगोट्यांचे देखील वाटप करण्यात आले. या निवडणुकीत राजकीय पक्ष न पाहता कार्यसक्षम उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. आंदोलनाच्या प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार सतीश काणे व बांधकाम व्यावसायिक शरद मुथा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या आंदोलनात ऍड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, हिराबाई ग्यानप्पा, अशोक भोसले, अंबिका नागुल, आश्‍विन शेळके आदिंसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 5 वर्षापुर्वी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या राजकीय मंडळींनी फक्त घोषणांचा पाऊस पाडला. मात्र या घोषणांची अंमलबजावणी अद्यापि झालेली नाही. 5 वर्षांपासून घरकुल वंचित मुलभूत निवार्याच्या हक्कासाठी लढत असताना त्यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करण्यात आले.

सर्वसामान्य नागरिकांना कवड्या-रेवड्याशिवाय काहीच हाती आले नसून, हे आंदोलन दडपण्याचे काम पोलिसांनी केले आहे. सरकारचा लेखाजोखा मांडण्याचा अधिकार जनतेला असल्याचे ऍड. गवळी यांनी म्हंटले आहे. घरकुल वंचित व बेरोजगारीचा हा आक्रोश असून, आंदोलन दडपून काही साध्य होणार नसून, सुजान नागरिक योग्य उमेदवाराला निवडून देऊन लोकशाही बळकट करणार असल्याची भावना अशोक सब्बन यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.