माण-खटावमध्ये भगवे वादळ आणणारच

शेखरभाऊ गोरे; येणाऱ्या दहा दिवसांत विरोधकांची झोप उडवणार

गोंदवले  – माण मतदारसंघातून आपल्याला शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाल्याने संपूर्ण मतदार संघ भगवामय झाला आहे. महिला मेळावा व उमेदवारी अर्जाच्या शक्तीप्रदर्शनात याची रंगीत तालीम झाली आहे. पण येणाऱ्या दहा दिवसात विरोधकांची झोप उडवत माण खटाव मतदारसंघात मोठमोठी भगवी वादळे आणणार असल्याचा सूचक इशारा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शेखरभाऊ गोरे यांनी विरोधकांना दिला आहे.

दहिवडी (ता. माण) येथील मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी विजय जाधव, पंढरीनाथ जाधव, समीर जाधव, गोरख जाधव, गणेश मुळीक, योगेश जाधव, दिलीप जाधव, विशाल जाधव आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने महिला व तरूण कार्यकर्ते उपस्थित होते.

शेखरभाऊ गोरे म्हणाले, माण खटाव मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा होता. मात्र हा मतदारसंघ मित्रपक्षाने घेतला असतानाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्यावर विश्‍वास टाकत आपल्याला शिवसेनेची अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यांचा विश्‍वास सार्थकी लावत आपण मतदारसंघातील घरोघरी पोहचलो आहोत. त्यामुळे मतदारसंघात भगवे वातावरण तयार झाले आहे. हेच वातावरण शिवसेनेला आमदार करून देणार आहे.

मतदानाला अजून दहा दिवस बाकी आहेत. या दहा दिवसात विरोधकांची झोप उडवत मतदारसंघात भगवे वादळ तयार करणार आहे. साथ हवी ती फक्त तुम्हा सर्वांची. महिलांना होममिनिस्टरचे माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिल्याने जिथे जाईल तिथे महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही निवडणूक आता महिलांनीच ताब्यात घेतल्याचे दिसून येत आहे. आणि महिलांनी हाती घेतलेले कार्य हे नेहमीच यशस्वी झाले आहे. त्यामुळे मला खात्री आहे की या निवडणुकीत आपल्या आमदारकीत महिलावर्गाचा सिंहाचा वाटा असणार आहे.

शेखर गोरे म्हणाले, मतदारसंघातील गावांगावात, वाड्यावस्त्यांवर गट-तट न पाहता विविध कामांसाठी करोडो रूपयांची कामे स्वखर्चातून करून दिली आहेत. मागेल त्यांना पाणी देत टॅंकरद्वारे नागरिकांची व मुक्‍या जनावरांची तहान भागवली आहे. मोफत रूग्णवाहिकेच्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचवले आहेत. जलसंधारणाच्या कामात प्रत्येकवर्षी डिझेलसह पोकलेन मशीनरी देऊन त्या कामांना पाठबळ देण्याचे काम केले आहे.

गरजू शालेय विद्यार्थ्यांची फी भरून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे. याच मदतीचे आशीर्वाद नागरिकांकडून मिळत आहेत.त्यांच्या आशीर्वादामुळेच मातोश्रीवरून आपल्याला शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. तुमच्या साथीने या मतदारसंघात बदल घडवत प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवत इतिहास रचू असे आवाहनही शेखरभाऊ गोरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.